राजस्थान येथे कुलदैवताच्या दर्शनासाठी गेलेल्या अजमीर सौंदाणे (ता. बागलाण) येथील मगर परिवारातील तीन चुलत भावांचा अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. दीपक मगर (६६), संदीप मगर (५३) आणि महेश मगर (५०) या तिघांवर रविवारी (ता. २५) एकाच ठिकाणी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील कर्ते पुरुष काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
जयपूरजवळ अपघात, काही भाविक जखमी
जयपूरजवळ झालेल्या अपघातात मगर परिवारातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर कुटुंबातील काही सदस्यांसह अन्य भाविक जखमी झाले. दीपक मगर हे निवृत्त कृषी अधिकारी होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असून तिन्ही मुले विवाहित व नोकरीला आहेत. त्यांच्या पत्नीही जखमी असून जयपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संदीप मगर यांच्यामागे आई, पत्नी आणि दोन मुले आहेत. एक मुलगा नोकरीस असून दुसरा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. महेश मगर यांच्यामागे आई-वडील, पत्नी आणि दोन मुले शिक्षण घेत आहेत.
गावात शोककळा, मान्यवरांनी केले सांत्वन
तिन्ही चुलत भावांचे मृतदेह गावात दाखल होताच गावकऱ्यांनी एकच आक्रोश करत अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. तिन्ही भावांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने प्रत्येक जण हळहळत होता. गावातील जयपूर येथे नोकरीस असलेले गोकूळ अहिरे, पंडित पवार, सुनील अहिरे यांनी जखमी भाविकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. अंत्यविधीप्रसंगी माजी आमदार संजय चव्हाण, बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडूकाका बच्छाव, भाजपचे नेते डॉ. विलास बच्छाव, डॉ. दिनेश बच्छाव, नगरसेवक विलास दंडगव्हाळ यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले.
Leave a Reply