नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील आयान मल्टीट्रेड एलएलपीने यंदाच्या गळीत हंगामाची तयारी पूर्ण केली आहे. नोव्हेंबर महिन्यात या हंगामाला प्रारंभ होईल. कारखान्याने शेतकऱ्यांशी जिव्हाळ्याचे नाते जपले असल्यामुळेच ऊस नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे, असा विश्वास कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक पद्माकर टापरे यांनी व्यक्त केला.
या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने गाळप करून साखर उत्पादनात आघाडी घेईल, असेही ते म्हणाले. यंदा गाळपासाठी १५ हजार हेक्टर उसाची नोंद झाली आहे. ऑक्टोबरमध्ये कारखान्याचा बॉयलर पूजन आणि अग्नी प्रदीपन सोहळा पार पडला असून गळीत हंगामासाठी यंत्रसामग्री सज्ज आहे.
पावसाच्या खंडाचा पिकावर परिणाम
जिल्ह्यात आणि परिसरात ऊस लागवडीचे प्रमाण चांगले आहे. हक्काचा कारखाना उपलब्ध असल्याने ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. मात्र पावसाचा खंड पडल्याने पिकाच्या वाढीला अडचणी आल्या. त्यामुळे यंदा नेहमीपेक्षा साखरेचा उतारा कमी येण्याची शक्यता आहे. हा परिणाम लक्षात घेऊन शासनाने कारखान्यांना उसाला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक उपक्रमांवर भर
आयान कारखाना शेतकऱ्यांच्या हिताबरोबरच सामाजिक उपक्रमांवरही भर देतो. बेणे निवडीपासून उसाच्या मशागतीपर्यंत आणि तोडणीपासून कारखान्यात ऊस आणण्यापर्यंतचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना केले जाते. यासाठी कारखान्याकडील कृषी तज्ज्ञांची टीम काम करते. सध्या कारखान्याचे सहाशे कामगार असून ऊसतोडीसाठी दहा हजारांपेक्षा जास्त मजूर काम करतात. मजुरांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून कारखाना परिसरात दरवर्षी दोन साखर शाळा चालवल्या जातात. याशिवाय वेळोवेळी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते आणि परिसरात वनराई तयार करून हजारो वृक्ष जगवले जात आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply