नाशिक: सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य वितरण अधिक सोपे करणाऱ्या नाशिक रोड येथील राज्यातील पहिल्या ‘अन्नपूर्ती धान्य एटीएम’ला लाभार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या सहा दिवसांत १५० लाभार्थ्यांनी या सुविधेच्या माध्यमातून धान्य उचलले आहे. नाशिक रोड येथील जुन्या धान्य वितरण कार्यालयाच्या आवारात हे एटीएम सुरू करण्यात आले आहे.
शनिवारपासून (ता. १७) लाभार्थ्यांना त्यांच्या सोयीच्या वेळी धान्य मिळू लागले आहे. त्यामुळे या सुविधेला पसंती मिळत असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाने सांगितले. या यशस्वी प्रयोगानंतर विभागाने नाशिक शहरात १० आणि येवला येथे एक, अशी आणखी ११ धान्य एटीएम उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
अधिकाऱ्यांकडे लवकरच प्रस्ताव
नवीन एटीएमचा प्रस्ताव लवकरच राज्याच्या पुरवठा विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यास पात्र लाभार्थ्यांना रेशन दुकानांवरील रांगांपासून दिलासा मिळू शकतो. धान्य वितरण अधिक पारदर्शक होण्यासाठी ई-पॉस यंत्रणा, आधार प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदींचा वापर करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे.
कुंभमेळ्यातही होणार उपयोग
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात आणखी १० धान्य एटीएम सुरू करण्याची तयारी सुरू आहे. राज्यस्तरावरून मंजुरी आणि आवश्यक पाठबळ मिळाल्यास पुढील तीन ते चार महिन्यांत ही सुविधा सुरू होऊ शकते. त्यामुळे स्थानिक पात्र लाभार्थ्यांसह कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू-महंतांना धान्य पुरवठ्याची व्यवस्था अधिक सुकर होण्याची अपेक्षा आहे.
Leave a Reply