‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता’ योजनेच्या नियमांत मोठी शिथिलता आणत शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी गटांना १०० टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.
अनुदानाची रचना कशी असेल
२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी लागू असलेल्या या सुधारित तरतुदींनुसार, वैयक्तिक शेतकऱ्यांना एका हेक्टरसाठी १०० टक्के अनुदानावर ४००० रुपये किमतीचे चारा बियाणे दिले जाणार आहे. शेतकरी गटांना पाच हेक्टरसाठी २० हजार रुपयांपर्यंतचे चारा बियाणे विनामूल्य उपलब्ध होईल.
जिल्ह्यातील चारा लागवडीचे नियोजन
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयानुसार जिल्ह्यात ११ हजार ७१५ एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यातून सुमारे २.७५ लाख मेट्रिक टन हिरवा चारा उत्पादित होण्याचा अंदाज आहे. या नियोजनासाठी एकूण १ लाख २८ हजार २६५ किलो बियाणे वितरित केले जाणार आहे. यामध्ये संकरित मका ५० हजार किलो, संकरित बाजरी ७ हजार २९९ किलो, संकरित ज्वारी १० हजार ७३० किलो, चारा मका ३१ हजार २५६ किलो आणि संकरित चारा मक्याचे २८ हजार ९८० किलो बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. सोबतच अतिरिक्त चारा बियाणे व ठोंब्यांचे वाटपही करण्यात येणार आहे. दुष्काळग्रस्त भागातील पशुधनासाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढवणे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply