, ३० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डिलिमिटेशनवरून राज ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

डिलिमिटेशन बिलावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खासदारांची संख्या वाढवण्यामागचा उद्देश काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

डिलिमिटेशनवरून राज ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल

डिलिमिटेशन बिलाच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली खासदारांची संख्या वाढवण्यामागचा नेमका उद्देश काय, याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या देशात 543 खासदार आहेत. त्यांनी नेमके काय केले आहे, असा सवाल उपस्थित करत आणखी खासदार वाढवण्याची गरज काय, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला.

या निर्णयामुळे राज्यांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येण्याची शक्यता असून, भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. दक्षिणेकडील राज्यांवर, विशेषतः महाराष्ट्रावर अन्याय होण्याची शक्यता अधिक असल्याचे राज ठाकरे म्हणाले. केंद्रावर राज्यांचे अवलंबित्व वाढवून संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला.

2018 पासून आपण या विषयावर बोलत असल्याचे सांगत, या घडामोडींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे यांना मते मिळत नाहीत, असे काही जण म्हणतात, मात्र आपल्याला मिळणारी मते दुसरीकडे जात असल्याचा दावाही त्यांनी केला.

विधानसभा निकालावरही प्रश्नचिन्ह

विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. महायुतीला विधानसभेत 232 जागा मिळाल्यानंतरही सर्वत्र शांतता होती. या जागा कशा मिळाल्या, हे त्यांनाही माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला. निवडणूक आयोगावरील विश्वास उडाल्याचे सांगत, मतदानाच्या शेवटच्या तासात अचानक मतदानाची टक्केवारी वाढल्याबद्दल त्यांनी संशय व्यक्त केला. ठाण्यात शेवटच्या एका तासात 80 ते 85 हजार मतदान होणे कसे शक्य आहे आणि हे नेमके कोण करत आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अजित पवार आणि शरद पवारांवर टीका

यावेळी राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचाही उल्लेख केला. अजित पवार भाजपसोबत गेले, तेव्हा आपण पहिली टीम रवाना झाली आहे असे ट्विट केले होते. त्यानंतर दुसरी टीमही जाईल, असे संकेत दिले होते. आता या घडामोडींना आकार येऊ द्या, त्यानंतर त्यावर बोलता येईल, असे ते म्हणाले.

शरद पवार यांच्याबाबत बोलताना राज ठाकरे यांनी ‘होकायंत्र दिशा दाखवते, पण हे धोकायंत्र आहे,’ अशी खोचक टीका केली. सध्या राजकारणात सत्ता आणि सत्तेतून पैसा हेच सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance