लोकसभा व विधानसभा मतदारसंघाची फेररचना होणार असून, तब्बल 50 टक्के जागा वाढणार आहेत. डिलिमिटेशन बिल मंजूर करण्यासाठी भाजपने संख्याबळ जमा केले आहे. या बिलावरून मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
लोकसभेच्या जागा वाढल्यानंतर भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले. उत्तरेतील राज्यांतील खासदारांची संख्या वाढणार आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, गोवा या सर्व राज्यांवर भविष्यात अन्याय होणार आहे. हा अन्याय जास्त प्रमाणात होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र हे दक्षिणेतील राज्य आहे. दक्षिण या शब्दाला मोगल काळात दख्खन म्हटले जायचे. त्यानंतर इंग्रजांनी त्याला डेक्कन म्हणायला सुरुवात केली. दक्षिणेच्या राज्यांवर सर्वात मोठा अन्याय असणार आहे, असे राज ठाकरे म्हणाले. केंद्रावर राज्ये अवलंबून ठेवण्यासाठी हा सगळा डाव असल्याचा दावा त्यांनी केला.
शरद पवारांवर ‘धोकायंत्र’ टीका
होकायंत्र दिशा दाखवते, पण शरद पवार हे धोकायंत्र आहेत, अशी खोचक टीका राज ठाकरे यांनी केली. अजित पवार ज्यावेळेस भाजपबरोबर गेले, तेव्हा आपण ट्विट केले होते. एक टीम रवाना झाली आहे. दुसरी लवकरच रवाना होणार आहे. त्याप्रमाणे झाले आहे, असे ते म्हणाले.
विधानसभा निकाल आणि निवडणूक आयोगावर संशय
2024 च्या विधानसभा निवडणुकीत 232 जागा महायुतीला मिळाल्या होत्या. पण महाराष्ट्रात सन्नाटा होता, जल्लोष दिसला नाही, असे राज ठाकरे म्हणाले. चोऱ्या माऱ्या करून मिळालेली सत्ता आहे. ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे, असा टोला त्यांनी लगावला. आम्हाला मते मिळतात पण आमची मते कापली जातात, असा दावाही त्यांनी केला. निवडणूक आयोगावर आपला विश्वास राहिलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात वीजप्रकल्प येतात ते केंद्राकडून येतात. राज्य सरकार ‘ब्र’ ही काढू शकत नाही. हे सर्व कुठे जाणार आहे हे आपल्याला समजते. एकदा हाताबाहेर गेल्यानंतर परत रिव्हर्स गेअर टाकणे अवघड आहे, असा धोकाही राज ठाकरे यांनी मांडला.
प्रतिक्रिया व्यक्त करा