डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांना साद घातली आहे. ‘भाऊ, लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र उभे राहा’, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे स्वतः स्टॅलिन यांची भेट घेण्यासाठी चेन्नईला रवाना झाले आहेत.
राहुल गांधींचे आवाहन
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्टॅलिन यांना ‘बंधू’ असे संबोधले. लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना त्यांनी सांगितले की, इंडिया आघाडीतील वरिष्ठ नेत्यांसह आपण स्वतः चेन्नईत येऊन त्यांची भेट घेणार आहोत. मतदारसंघ पुनर्रचनेच्या घटनादुरुस्ती विधेयकाला विरोध करण्यासाठी द्रमुकने इंडिया आघाडीसोबत उभे राहावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
स्टॅलिन हे नेहमीच तमिळविरोधी शक्तींविरोधात खंबीरपणे उभे राहिले आहेत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशाचे हित, तामिळनाडूचे हित आणि भारतीय राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हे विधेयक पराभूत केले पाहिजे, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
स्टॅलिन यांचे उत्तर
राहुल गांधी यांच्या आवाहनाला एम. के. स्टॅलिन यांनीही सोशल मीडियावरून उत्तर दिले. भारतीय राज्यघटनेचे संरक्षण आणि राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी द्रमुकने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे, असे स्टॅलिन यांनी म्हटले. या योगदानाची दखल घेतल्याबद्दल त्यांनी राहुल गांधी यांचे आभार मानले.
तामिळनाडू आणि तमिळ जनतेचे हित हेच द्रमुकसाठी नेहमी सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. राज्यांचे अधिकार, संघराज्य व्यवस्था आणि राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांबाबत पक्षाची भूमिका कायम ठाम राहिली आहे. या भूमिकेशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.
स्टॅलिन यांनी ‘इतिहास आम्हाला कट्टाबोम्मन म्हणून लक्षात ठेवेल, एट्टप्पन म्हणून नाही’, असेही म्हटले आहे. वीरपांडिया कट्टाबोम्मन हे ब्रिटिश सत्तेविरोधात लढणारे शूर योद्धे होते, तर एट्टप्पन हे नाव तमिळ सांस्कृतिक संदर्भात विश्वासघाताचे प्रतीक मानले जाते. दरम्यान, यापूर्वी अमित शाह यांनी दक्षिणेतील राजकीय पक्षांशी चर्चा केल्याने द्रमुक या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा होती. मात्र राहुल गांधी यांच्या आवाहनाला स्टॅलिन यांनी दिलेल्या उत्तरामुळे इंडिया आघाडीतील राजकीय समीकरणांना पुन्हा महत्त्व आले आहे. आता राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्टॅलिन काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा