मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण ही दोन विधेयके एकत्र मांडण्यासाठी सरकारने संसदेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. प्रत्येक राज्यात लोकसभेचे मतदारसंघ पन्नास टक्क्यांनी वाढवणारे विधेयक मंजूर करून घेणे हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. सहा महिन्यांपूर्वी याच जोड विधेयकावर लोकसभेत एनडीए सरकारला पराभव पत्करावा लागला होता.
एप्रिल २०२६ मध्ये १६ ते १८ एप्रिलदरम्यान बोलावलेल्या विशेष अधिवेशनात हे विधेयक २९८ विरुद्ध २३० मतांनी फेटाळले गेले होते. दोन तृतियांश बहुमतासाठी सरकारला ५४ मते कमी पडली होती. गेल्या बारा वर्षांत संसदेत मोदी सरकारचा हा पहिलाच मोठा पराभव ठरला होता. मात्र त्यानंतरच्या काळात राजकीय समीकरणे बदलली. शरद पवार, एम. के. स्टॅलिन आणि जगनमोहन रेड्डी यांनी, तसेच तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या वीस खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे ५४३ जागांवरून ८१५ जागा निर्माण करणारे विधेयक मंजूर होणे सरकारला सुलभ झाल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. नारीशक्तीला संसदेत आणि विधानसभेत सहभाग मिळवून देण्याची लढाई अनेक दशकांपासून चालू असल्याचे त्यात म्हटले आहे.
महिला आरक्षणाचा प्रवास
२०२३ मध्ये लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक संसदेने मंजूर केले होते. लोकसभेत ते ४५४ विरुद्ध २ मतांनी मंजूर झाले, तर राज्यसभेत उपस्थित असलेल्या सर्व २१४ सदस्यांनी त्याला समर्थन दिले. मात्र जनगणनेनंतर मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावरच महिला आरक्षण लागू होईल, ही त्यातील मोठी अडचण होती. २०२७ मध्ये जनगणना झाल्यावर मतदारसंघ पुनर्रचना होणार आणि त्यानंतर २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत महिला आरक्षण लागू होईल, हा पेच होता. म्हणून सरकारने २०११ ची जनगणना आधारभूत मानून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणले आणि त्याला महिला आरक्षणाची जोड दिली.
२०२७ मध्ये जनगणना होणार असताना २०११ ची जनगणना आधारभूत मानण्याला विरोधी पक्षांचा आक्षेप आहे. वाढलेल्या लोकसंख्येवर आधारित पुनर्रचनेचा लाभ उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यांना होईल आणि लोकसंख्या कमी असलेल्या दक्षिणेतील राज्यांचे नुकसान होईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मतदारसंघ पुनर्रचना मंजूर झाल्यास दक्षिणेतील राज्यांचे मतदारसंघ उत्तरेतील राज्यांच्या तुलनेने कमी वाढतील, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
संख्याबळाचे गणित
लोकसभेत सध्या तीन जागा रिक्त आहेत. त्यामुळे ५४० सदस्यांच्या सभागृहात दोन तृतियांश बहुमतासाठी ३६१ मते आवश्यक आहेत. एप्रिलमध्ये मतदानावेळी एनडीएकडे २९८ मते होती; आता एनडीएची सदस्य संख्या ३२० आहे. त्यामुळे आणखी ४१ मतांची गरज आहे. द्रमुकच्या २२ खासदारांचे समर्थन स्टॅलिन यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ आणि तृणमूल काँग्रेसचे २० खासदार, तसेच काही लहान पक्षांचे व अपक्षांचे समर्थन सरकारला मिळणे अपेक्षित आहे.
पुनर्रचनेत तामिळनाडूचा ७.२ टक्के वाटा कायम असावा, अशी द्रमुकची अपेक्षा आहे, तर सर्व राज्यांत समान ५० टक्के जागा वाढाव्यात, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर लोकसभेत २७२ जागा महिलांसाठी आरक्षित असतील. फेब्रुवारी-मार्च महिन्यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. काँग्रेसने सध्या अस्तित्वात असलेल्या ५४३ मतदारसंघांतच महिला आरक्षण लागू करावे, असा आग्रह धरला आहे. विशेष अधिवेशन बोलावले असले तरी नियमित हिवाळी अधिवेशन कधी होणार, याचा मागमूस नसल्याकडेही काँग्रेसने लक्ष वेधले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा