मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार इंडिया आघाडीतून बाहेर पडू शकतात. त्यातून इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी धोक्यात येऊ शकते. शरद पवार एनडीएमध्ये गेल्यास राज्याचे राजकारण कसे असेल, याचे विश्लेषण सध्या चर्चेत आहे.
सध्याचे समीकरण आणि पवारांचा पाया
सध्या महाराष्ट्रात भाजप, शिवसेना-शिंदे गट आणि राष्ट्रवादी-अजित पवार गट यांची महायुती आहे. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना-उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अशी महाविकास आघाडी आहे. शरद पवारांनी एनडीएमध्ये प्रवेश केला तर राज्यातील अनेक राजकीय गणितही बदलणार आहेत.
शरद पवार यांचे राजकारण पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही भाग आणि मराठवाड्यातील काही भागापुरतेच मर्यादित आहे. अनेकदा राष्ट्रवादीला अडीच जिल्ह्यांचा पक्ष असे हिणवले गेले. पण भाजपच्या लाटेतही पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार गट काही प्रमाणात टिकून राहिला आहे. लोकसभेत शरद पवार गटाचे आठ खासदार आहेत. त्यातील चार पश्चिम महाराष्ट्रातील असून विदर्भातून केवळ अमर काळे आहेत. दिंडोरी, बीड आणि भिवंडीतही गटाचे खासदार आहेत. विधानसभेत दहा आमदार असून त्यातील आठ पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. सर्वाधिक चार आमदार सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
पुणे, बारामती, सातारा, सांगली, सोलापूर आणि अहिल्यानगर या पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक नेटवर्क आहे. सहकार क्षेत्रातील नेते आणि कार्यकर्त्यांचे जाळे भाजपच्या राजकीय विस्ताराला मदत करू शकते.
दोन्ही गटांचे एकत्रीकरण आणि महाविकास आघाडीसमोरील आव्हान
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा ही या संभाव्य घडामोडीतील सर्वात महत्त्वाची बाजू असेल. शरद पवार एनडीएमध्ये गेले तर अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र येणार का, की वेगवेगळे म्हणून महायुतीत राहणार, हा प्रश्न निर्माण होणार आहे. दोन्ही गट एकत्र आल्यास पक्षाची संघटनात्मक ताकद वाढू शकते. मात्र नेतृत्व, महत्त्वाची पदे आणि आगामी निवडणुकीतील उमेदवारी यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे एकमेकांविरोधात लढलेल्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणणे सोपे नसेल.
शरद पवार यांच्यामुळेच 2019 ला महाविकास आघाडी अस्तित्वात आली. महाविकास आघाडीचे शिल्पकार तेच मानले जातात. राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षांच्या एकत्रीकरणासाठीही ते महत्त्वाचा दुवा राहिले आहेत. त्यामुळे तेच एनडीएमध्ये दाखल झाल्यास महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी धोक्यात येईल आणि काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते.
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसची बरीच ताकद आहे. सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती आणि सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील अशी काँग्रेसची ताकद आहे. मात्र विश्वजित पाटील हे एकमेव आमदार आहेत. कोल्हापूरमध्ये बंटी पाटील हे काँग्रेससाठी हुकमी एक्का असल्याचे मानले जाते.
शरद पवारांच्या संभाव्य निर्णयात सुप्रिया सुळे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. शरद पवार यांचे वय पाहता ते कधीही राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात. त्यात आमदार रोहित पवार हे भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत, त्यामुळे ते वेगळा निर्णय घेऊ शकतात.
महाविकास आघाडीतील शिल्पकार दूर झाल्यास विरोधी आघाडीची ताकद आणि मतांचे एकत्रीकरण कमकुवत होण्याची शक्यता आहे. मात्र ठाकरे गट व काँग्रेस एकत्र राहिल्यास फायदे होऊ शकतात. ठाकरे गट मोठ्या शहरात जम बसवेल, तर काँग्रेस ग्रामीण भागात आपला जनाधार निर्माण करू शकते.
शरद पवार एनडीएमध्ये आले तर देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर महायुतीचा समतोल राखण्याचे आव्हान असणार आहे. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात आधीच सत्तेचे वाटप आहे. त्यात शरद पवारांच्या गटाची भर पडल्यास मंत्रिपदे आणि जागावाटपावरून नवे संघर्ष निर्माण होऊ शकतात, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, त्यामुळे भविष्यातील राजकारण कसे असेल, हे भविष्यकाळावरच सोडून द्यावे लागेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा