परिसीमन विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुढाकाराने विरोधकांचे शिष्टमंडळ चेन्नईत दाखल झाले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. या भेटीत विधेयकाविरोधात विरोधकांची एकत्रित रणनीती ठरवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
चेन्नईत कोणते नेते दाखल झाले
या दौऱ्यात इंडिया आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांचा सहभाग आहे. मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी आणि कपिल सिब्बल यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे नेते चेन्नईत पोहोचले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. मात्र, राजदच्या खासदार मीसा भारती या चेन्नई आणि मुंबईच्या दौऱ्यात सहभागी झालेल्या नाहीत. त्यांच्या पक्षाकडून अभय कुशवाह आणि सुधाकर सिंह यांनी उपस्थिती लावली आहे.
दौरा आता मुंबईकडे
स्टॅलिन यांच्याशी चर्चा करून विधेयकाला विरोध करण्याची त्यांची भूमिका अधिक ठाम करण्याचा काँग्रेस नेतृत्वाचा प्रयत्न आहे. त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुंबईकडे रवाना होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत उद्धव ठाकरेही उपस्थित राहण्याची शक्यता असून, विरोधकांच्या पुढील राजकीय रणनीतीवर चर्चा होणार आहे. चेन्नई ते मुंबईपर्यंत बैठकांचे हे सत्र विधेयक रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग असल्याचे मानले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा