वाढवणपासून गडचिरोलीपर्यंत आणि कर्जतपासून तारळीपर्यंत सध्या अनेक प्रकल्पांची चर्चा ऐकायला मिळत आहे. या प्रकल्पांविषयी बोलताना एका गोष्टीचा उल्लेख वारंवार केला जातो. तो म्हणजे ईआयए अर्थात एन्व्हायर्नमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. त्याला पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन किंवा पर्यावरणीय आघात आढावा म्हणतात. एखाद्या प्रकल्पाचा पर्यावरणावर काय परिणाम होऊ शकतो, याचा अभ्यास करून केलेली ही मांडणी असते.
ईआयए म्हणजे काय आणि त्याची उद्दिष्टं कोणती
संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण संस्थेच्या मते, एखाद्या प्रस्तावित प्रकल्पाचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक परिणाम काय असतील हे शोधण्यासाठी ईआयए हे एक महत्त्वाचं साधन आहे. ईआयएच्या आधारे एखादा प्रकल्प एखाद्या विशिष्ट जागी उभारणं योग्य आहे की नाही हे ठरवता येतं. तसंच प्रकल्पाचे परिणाम आणि धोके आधीच लक्षात आल्यानं त्यावर उपाययोजना करता येतात. त्यातून पर्यावरणाची हानी टाळता येते. जैवविविधता, हवा, पाणी आणि जमिनीचं नुकसान टाळणं, आर्थिक विकास आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधणं, कमी हानिकारक तंत्रज्ञान किंवा पर्यायी जागांचा विचार करणं ही ईआयएची उद्दिष्टं असतात.
भारतात ईआयएची कायदेशीर तरतूद
भारतात पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत कोणत्याही प्रस्तावित विकास प्रकल्पाचं काम सुरू करण्याआधी पर्यावरणीय परवानगी घेणं बंधनकारक आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ही परवानगी देतं. ती द्यायची की नाही, हे तज्ज्ञांची एक समिती म्हणजे एक्सपर्ट अप्रायझल कमिटी ठरवते आणि हे ठरवताना ईआयएची भूमिका महत्त्वाची ठरते. २००६ सालच्या ईआयए अधिसूचनेनुसार खाणकाम, औष्णिक विद्युत केंद्र, धरणे किंवा नदीच्या पात्रातील प्रकल्प, मोठे उद्योग तसंच रस्ते, महामार्ग, पूल, बंदर, विमानतळ अशा पायाभूत सुविधा उभारताना मंजुरी घेण्यापूर्वी ईआयए करणं आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून परवानगी घेणं बंधनकारक आहे. तर लहान इमारती आणि बांधकामं, मध्यम उद्योग, छोट्या खाणी यांच्यासाठी राज्यस्तरीय मंजुरी लागते. या प्रकल्पांसाठी ईआयए आवश्यक आहे की नाही हे प्रकल्पाचं स्वरूप, आकार आणि क्षमतेनुसार राज्यस्तरीय समिती ठरवते. ईआयए करताना छाननी म्हणजे स्क्रीनिंग ही पहिली पायरी असते. त्यात प्रस्तावित प्रकल्पाचं स्वरूप, आकार आणि क्षमता पाहून ईआयए करणं आवश्यक आहे की नाही, हे राज्य सरकार ठरवतं.
प्रतिक्रिया व्यक्त करा