‘जय जय स्वामी समर्थ’ या लोकप्रिय मालिकेत सध्या भक्ती आणि नात्यांची अत्यंत भावनिक कसोटी पाहायला मिळत आहे. आपल्या साध्याभोळ्या संसारात सुखाचे क्षण शोधणाऱ्या रुही आणि शंकरच्या आयुष्यात अचानक मोठे वादळ घोंघावू लागले आहे. स्वामींच्या कृपेने जुळलेले हे नाते आता अशा वळणावर येऊन ठेपले आहे, जिथे एका बाजूला हक्काचा संसार आहे, तर दुसऱ्या बाजूला अढळ स्वामीभक्ती. या कठीण प्रसंगातून रुही कसा मार्ग काढणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे. ही मालिका दररोज रात्री ८.१० वाजता पाहता येते.
## शंकरच्या मनात का निर्माण झाली कटुता?
मालिकेच्या आगामी भागांत अपमान आणि गैरसमजांच्या जाळ्यात अडकलेला शंकर स्वतःच्याच माणसांपासून दुरावताना दिसणार आहे. विरोधकांच्या कारस्थानाला बळी पडून शंकरच्या मनात स्वामींबद्दल कटुता निर्माण झाली असून, त्याने रुहीसमोर संसार किंवा स्वामीभक्ती यापैकी एकाची निवड करण्याचा कठोर पेच उभा केला आहे.
## रुहीचे धाडसी पाऊल
एकीकडे पतीचा संताप आणि टोकाचा निर्णय, तर दुसरीकडे आपल्या लाडक्या गुरूंवरील अतूट श्रद्धा, या कात्रीत रुही पूर्णपणे अडकली आहे. तिने आपल्या गुरूंची साथ सोडण्यास स्पष्ट नकार दिल्याने तिच्या संसारावर आता तुटण्याची टांगती तलवार उभी राहिली आहे. या सर्व संकटांच्या मालिकेत रुही आपल्या प्रेमाची आणि निष्ठेची अभूतपूर्व परीक्षा देण्यास सज्ज झाली आहे. नवऱ्याला चुकीच्या वाटेवरून परत आणण्यासाठी आणि आपल्या नात्याचा सन्मान राखण्यासाठी तिने उचललेले पाऊल अत्यंत धाडसी आणि मन हेलावून टाकणारे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा