मराठी अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘येतेच आता मी नांदायला’ असे या मालिकेचे नाव असून, तिची निर्मिती सोहम प्रॉडक्शनने केली आहे. या मालिकेसाठी पूजा निवडली गेली, मात्र त्याआधी तिने ऑडिशन देण्यास नकार दिला होता, असा किस्सा तिची सासू आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत सांगितला.
## ऑडिशनला नकार का दिला?
सुचित्रा बांदेकर यांनी सांगितले की, त्यांनी पूजाला ऑडिशन देण्याबद्दल विचारले असता तिने स्पष्ट नकार दिला. आपलेच प्रॉडक्शन हाऊस असल्यामुळे लोक म्हणतील की, घरच्यांनीच तिला काम दिले, अशी भीती तिला वाटत होती. त्यामुळे तिला ऑडिशन द्यायची नव्हती.
## सासूने कसे मन वळवले?
सुचित्रा बांदेकर यांनी पूजाला समजावले की, बोलणारे लोक काहीही बोलत राहतील. या मालिकेत त्यांचे आणि वाहिनीचे पैसे लागले आहेत, त्यामुळे घरची म्हणून घेण्याचा प्रश्नच येत नाही. मनापासून ऑडिशन द्यायची असेल तर दे, असे त्या म्हणाल्या. त्यानंतर पूजाने ऑडिशन दिली. तिची ऑडिशन क्लिप पाठवण्यात आली. अनेक जणी शॉर्टलिस्ट झाल्या होत्या आणि अखेर वाहिनीने पूजाची निवड केली. निर्मिती करताना समोरची व्यक्ती चांगली कलाकार असण्याबरोबरच चांगली माणूसही असावी, असे मत सुचित्रा बांदेकर यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा