डिलिमिटेशन विधेयकावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे राजकीय वातावरण तापले आहे. केंद्र सरकारकडून लोकसभेत सोमवारी (३० नोव्हेंबर) हे विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना भावनिक पत्र लिहून या विधेयकाला विरोध करण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून या विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता असल्याची चर्चा असून पक्षात याबाबत संभ्रमाची परिस्थिती आहे.
पत्रात काय म्हटले आहे?
पत्र लिहिताना मनात प्रचंड अस्वस्थता आणि वेदना असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याच्या स्थितीत नाहीत, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. साहेब लवकरच ठणठणीत बरे होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र अशा कठीण प्रसंगी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेमुळे पुरोगामी विचारांना मानणाऱ्या जनतेला मोठा धक्का बसला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
संघराज्य पद्धतीला तडा देणाऱ्या आणि २०११ साली झालेल्या १५ वर्षे जुन्या जनगणनेच्या आधारावरील या विधेयकामुळे अनुसूचित जाती-जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळणार नाहीत आणि हा अन्याय त्यांना पुढील २५ वर्षे सहन करावा लागेल, असे पत्रात म्हटले आहे. नवीन जनगणनेच्या आधारे जातनिहाय खरे आकडे समोर येणार असून सरकारने वेळीच ही जनगणना केली असती तर हे आधीच झाले असते, असेही त्यांनी म्हटले आहे. आता उशिरा का होईना जनगणना सुरू असून त्याआधारे २०२७ मध्ये मतदारसंघांची संविधानिक पद्धतीने फेररचना होणारच आहे, मग आज भाजपकडून त्यासाठी इतकी घाई का केली जात आहे, यामागील छुपा हेतू समजून घेणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद आहे.
महिला आरक्षण आणि डिलिमिटेशन विधेयक याचा काहीही संबंध नसल्याचेही पत्रात म्हटले आहे. महिला आरक्षण विधेयक २०२३ मध्येच संसदेने मंजूर केले असून पक्षानेही त्याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्याची अंमलबजावणी आत्ताही करता येते, मग ती का केली जात नाही, असा प्रश्न पत्रात उपस्थित करण्यात आला आहे. भाजपकडून मतदारसंघांची पुनर्रचना पारदर्शकपणे केली जाईल, यावर कुणीच विश्वास ठेवू शकत नाही, असेही पत्रात म्हटले आहे. आसाममध्ये मतदारसंघांची आखणी ज्या पद्धतीने करण्यात आली, त्याचा दाखला पत्रात देण्यात आला आहे.
पक्षात संभ्रम; काही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
पक्षाकडून विधेयकाला पाठिंबा दिला जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळाल्यानंतर काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देखील दिला असल्याचे समजते. शरद पवार यांच्या आजारपणामुळे त्यांच्यामागे घेतल्या जाणाऱ्या या निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यभराच्या तपाचा भंग होऊ नये, हीच आपली प्रामाणिक भावना असल्याचे रोहित पवार यांनी पत्रात म्हटले आहे. पक्षातील काही खासदार आणि आमदार सत्तेसोबत जाण्याचा विचार करत असल्याने किंवा त्यांना तसे करण्यास भाग पाडले जात असल्याने त्यांचा दबाव असणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. ज्यांना जायचे असेल त्यांना खुशाल जाऊ द्या, त्यांचे खरे चेहरेही समोर येऊ द्या, असेही पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनता स्वाभिमानी असून पवारांवर प्रेम करणारी आहे, असा विश्वास पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. पक्ष रस्त्यावर उतरून एक पाऊल पुढे आला तर जनता दहा पावले पुढे येईल, असे रोहित पवार म्हणाले आहेत. विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चेमुळे राज्यभरातील पुरोगामी विचारांना मानणारा मोठा वर्ग, निष्ठावान मतदार आणि तळागाळातील कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि अस्वस्थ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे उद्या संसदेत मांडल्या जाणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे, इतकेच नाही तर विरोधात असल्याची स्पष्ट भूमिका आजच जाहीर करून कार्यकर्त्यांना आणि पुरोगामी जनतेला विश्वास द्यावा, अशी विनंती पत्रात करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा