पुणे येथील खडकवासला येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत बुलढाण्यातील ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुप आणि रणरागिणी महिला ग्रुपच्या धावपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत बुलढाण्याचा नावलौकिक वाढविला. या स्पर्धेत बुलढाण्याच्या महिला धावपटूंनी विशेष चमक दाखवत पोडियम मिळविले, तर पुरुष व महिला अशा एकूण अनेक धावपटूंनी विविध अंतरांच्या स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या.
७५ किमीमध्ये डॉ. अश्विनी जाधव यांचे पोडियम
या स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरल्या त्या बुलढाण्याच्या महिला धावपटू. डॉ. अश्विनी जाधव यांनी तब्बल ७५ किलोमीटर अंतराची अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करून पोडियम स्थान पटकावले आणि बक्षीस मिळविले. त्याचप्रमाणे डॉ. विद्या घोंगटे आणि मंगल गवई यांनी २५ किलोमीटर गटात पोडियम मिळवून बुलढाण्याच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा रोवला.
विविध गटांत बुलढाण्याच्या धावपटूंचे यश
५५ किलोमीटर गटात गजानन पाटील, पांडुरंग नाफडे, अॅड. शरद राखोंडे, गजानन वराडे, अरुण सौभागे आणि रवींद्र पाटील यांनी अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने ५५ किलोमीटर अंतराची खडतर स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ३५ किलोमीटर गटात गजानन डुकरे, उमेश गाढवे, सुरेश शिंबरे, निशांत उबरहंडे आणि विद्या सानप यांनी मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली. तर २५ किलोमीटर गटात डॉ. विद्या घोंगटे, डॉ. वर्षा तांगडे, मंगल गवई, वर्षा हिवाळे, किरण लव्हाळे, संजीवनी कोलते, सीमा डुकरे, मनीषा जाधव, नंदा चाटे, शीतल मोगल, अनिता कापरे आणि प्रतिभा पायघन यांनी यशस्वी सहभाग नोंदवत २५ किलोमीटर अंतर पूर्ण केले.
महिलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग नोंदवून केवळ सहभागापुरते मर्यादित न राहता पोडियमपर्यंत मजल मारली. त्यांचा सहभाग इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा