नाशिकच्या गोदाघाटावर रामकाल पथ प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकासकामांदरम्यान आढळलेल्या पुरातन शिवलिंग, नंदी आणि लहान मंदिराची शनिवारी (२८ नोव्हेंबर) सकाळी केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या पथकाने पाहणी केली. छत्रपती संभाजीनगर सर्कलचे अधीक्षक पुरातत्त्वज्ञ अरुण मलिक यांनी सकाळी ९:१५ वाजता पथकासह या परिसराची पाहणी केली.
रामकुंड परिसरात दुतोंड्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस सुरू असलेल्या खोदकामात पुरातन शिवलिंग, नंदी आणि मंदिराचे अवशेष सापडले होते. खोदकाम सुरू असताना भुयारी मार्ग दिसला. आत डोकावून काही भाविकांनी पाहिले असता तेथे शिवलिंग, नंदी आणि मंदिराचे काही अवशेष आढळून आले. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
पुरातत्त्व खात्याने या घटनेची गंभीर दखल घेत महापालिकेला पत्र लिहून खोदकाम थांबवण्याची सूचना केली होती. अवशेष मिळताच खोदकाम थांबवण्यात आले होते.
१९१७ च्या नकाशातून उलगडला इतिहास
पाहणीदरम्यान या परिसराचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारे ठोस पुरावे पथकासमोर मांडण्यात आले. १९१७ मधील सिटी सर्व्हे कार्यालयाचा मूळ नकाशा आणि एका जुन्या छायाचित्रानुसार या जागेलगतच आणखी पाच पुरातन मंदिरे असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. याच पाच मंदिरांच्या समूहावरून गोदावरी नदीपात्रातील १७ पुरातन कुंडांपैकी एका कुंडाला ‘पाच देऊळ कुंड’ (सूर्य कुंड) असे नाव मिळाले आहे.
अशा स्वरूपाची ऐतिहासिक नोंद सन १८८३ च्या ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक गॅझेटियर’ मध्येही आढळते. त्यामुळे गोदाघाट परिसराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.
संवर्धनाची मागणी
नाशिकचा हा अनमोल सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लक्षात घेता, या सर्व पुरातन वास्तू आणि मंदिरांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन आणि संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच रामकुंड येथील अरुणा नदीचे गौमुख आणि महर्षी गौतम ऋषी यांच्या मूर्तीचे संवर्धन तातडीने व्हावे, अशीही मागणी करण्यात आली.
यावर अरुण मलिक यांनी हे सर्व विषय राज्य पुरातत्त्व विभाग, नाशिक यांच्याकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती दिली. या सर्व पुरातन वास्तूंचे जतन आणि संवर्धन केले जावे, असे त्यांनी सांगितले.
या पाहणीप्रसंगी गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी, पुरोहित संघाचे सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल, विराग गुप्ता यांच्यासह केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी म्हणाले की, रामकुंड परिसरातील पर्यावरणपूरक कार्याला कोणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, पण नाशिकच्या पुरातन सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करणे, हे नाशिककर या नात्याने आपले प्रथम कर्तव्य आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा