थंडीच्या हंगामात स्वेटर आणि हुडी हे रोजच्या वापरातील महत्त्वाचे कपडे ठरतात. मात्र चुकीच्या पद्धतीने धुतल्यास त्यांचा आकार बिघडतो, रंग फिका पडतो आणि मऊपणा कमी होतो. काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास हे कपडे वर्षानुवर्षे नव्यासारखे राहू शकतात.
धुताना या गोष्टी लक्षात ठेवा
स्वेटर किंवा हुडी धुण्याआधी त्यावर दिलेल्या सूचना वाचणे महत्त्वाचे आहे. काही कपडे हाताने धुवावे लागतात, तर काही वॉशिंग मशीनमध्ये धुता येतात. त्यामुळे कपड्याच्या लेबलनुसारच ते धुवावेत.
धुण्यासाठी थंड पाणी वापरणे चांगले. गरम पाण्यामुळे काही कपडे आकसू शकतात आणि त्यांचा आकार खराब होऊ शकतो. त्यामुळे थंड पाण्यातच धुणे योग्य ठरते.
जास्त तीव्र डिटर्जंट वापरण्याऐवजी सौम्य लिक्विड डिटर्जंट वापरावे. यामुळे कपड्यांचा रंग आणि मऊपणा टिकून राहतो.
लोकरीचे स्वेटर शक्यतो हाताने धुवावेत. एका बादलीत थंड पाणी घेऊन त्यात थोडे लिक्विड डिटर्जंट टाकावे. स्वेटर काही वेळ पाण्यात ठेवून नंतर हलक्या हाताने स्वच्छ करावा. जोरात चोळू किंवा पिळू नये.
स्वेटर किंवा हुडीवर चहा, कॉफी किंवा खाण्याचे डाग पडल्यास ते लगेच स्वच्छ करावेत. डाग असलेल्या जागेवर थोडे लिक्विड लावून हलक्या हाताने पुसून घ्यावे. जोरात घासल्यास कपडा खराब होऊ शकतो.
वाळवताना आणि ठेवताना काळजी घ्या
स्वेटर आणि हुडी वाळवताना कडक उन्हात ठेवू नयेत. लोकरीचे स्वेटर स्वच्छ टॉवेलवर पसरवून सावलीत वाळवावेत. यामुळे स्वेटरचा आकार आणि मऊपणा टिकून राहण्यास मदत होते.
स्वेटर आणि हुडी पूर्णपणे सुकल्यानंतरच कपाटात ठेवावेत. लोकरीचे स्वेटर हँगरला टांगण्याऐवजी घडी करून ठेवावेत. तसेच कपड्यांमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्यावी.
या सात सोप्या सवयी अंगीकारल्यास थंडीच्या प्रत्येक हंगामात तुमचे आवडते स्वेटर नव्यासारखेच राहतील.
प्रतिक्रिया व्यक्त करा