नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रेम, विश्वास आणि एकमेकांना वेळ देणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढीच आर्थिक पारदर्शकताही महत्त्वाची ठरते. अनेकदा इतर कोणताही वाद नसताना केवळ पैशांवरून जोडप्यांमध्ये मतभेद निर्माण होतात. त्यामुळे जोडीदारासोबत आर्थिक गोष्टींवर मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे.
आर्थिक पारदर्शकतेने काय साध्य होते?
नात्यात आर्थिक पारदर्शकता असल्यास एकमेकांवरील विश्वास अधिक मजबूत होतो आणि पैशांवरून गैरसमज निर्माण होत नाहीत. जोडीदाराचा पगार किती आहे, खर्च कशावर होतो आणि किती बचत होते, याची माहिती दोघांनाही असणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिक बाबतीत गुप्तता राहत नाही आणि नात्यात मोकळेपणा निर्माण होतो. भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे, बचत, कर्ज आणि खर्च यांचे नियोजन जोडीदारासोबत चर्चा करून केल्यास लग्न, घर खरेदी, मुलांचे शिक्षण, प्रवास किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य यासाठीचे नियोजन सोपे जाते. आर्थिक स्वावलंबन जपत आपत्कालीन निधी तयार केल्यास अनपेक्षित अडचणींचा सामना करणे सोपे होते.
वाद टाळण्यासाठी कोणती पावले घ्यावीत?
अनेक जोडपी वैयक्तिक खर्च, पगार, बचत, कर्ज किंवा भविष्यातील आर्थिक नियोजन याबद्दल एकमेकांशी बोलणे टाळतात. त्यामुळे नंतर गैरसमज आणि वाद निर्माण होऊ शकतात. खर्च करण्याच्या सवयी वेगवेगळ्या असल्यामुळेही मतभेद होतात — एकाला पैसे खर्च करायला आवडतात, तर दुसऱ्याला बचत महत्त्वाची वाटते. अशावेळी एकमेकांच्या आर्थिक सवयी समजून घेतल्यास मतभेद कमी होऊ शकतात. जोडीदारावर कोणते कर्ज आहे, ईएमआय किती आहे किंवा इतर कोणत्या आर्थिक जबाबदाऱ्या आहेत, हे माहीत असल्यास दोघांनाही आर्थिक मर्यादा समजतात आणि अनावश्यक वाद टाळता येतात.
प्रतिक्रिया व्यक्त करा