पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस येथील फलाट क्रमांक पाचवर दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारी या काळात ७५ दिवसांचा मोठा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या स्थानकांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच चार उपनगरीय लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी बदललेली यादी एकदा तपासून घेणे आवश्यक आहे.
कोणत्या गाड्या कुठून धावणार?
भुज–वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ३० नोव्हेंबर ते १२ फेब्रुवारी या काळात वांद्रेऐवजी दादर स्थानकावरच थांबेल आणि तिथेच तिचा प्रवास संपेल. वांद्रे टर्मिनस–भुज एक्स्प्रेस वांद्रेऐवजी दादरहून संध्याकाळी ५:४० वाजता सुटेल. दुसरीकडे, अजमेर–दादर, श्री गंगानगर–दादर आणि भगत की कोठी–दादर या गाड्या आता दादरऐवजी वांद्रे टर्मिनसपर्यंत धावतील आणि तिथूनच दुपारी २:५५ वाजता परतीच्या प्रवासाला निघतील.
बोरिवलीहून सुटणाऱ्या गाड्या आणि रद्द लोकल
भुज (२२९०४), उधना (१९०५६), मडगाव (१०११६), जयपूर (१९७२३) आणि दौराई (१९६२५) येथून वांद्रे टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या ब्लॉकच्या काळात बोरिवली स्थानकावरच थांबतील. परतीच्या प्रवासात उधना (सकाळी ९:४०), मडगाव (सकाळी ७:२५), जयपूर (सकाळी ९:२५) आणि दौराई (सकाळी ९:२५) या गाड्या वांद्रेऐवजी बोरिवलीहून सुटतील. तसेच १ डिसेंबर ते १३ फेब्रुवारीदरम्यान चार लोकल रद्द राहतील — चर्चगेट–बोरिवली जलद लोकल (दुपारी २:५०), बोरिवली–चर्चगेट मंद लोकल (दुपारी ३:४०), चर्चगेट–बोरिवली वातानुकूलित जलद लोकल (सायंकाळी ५:२८) आणि बोरिवली–चर्चगेट वातानुकूलित जलद लोकल (सायंकाळी ६:२४). त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे.
प्रतिक्रिया व्यक्त करा