स्वयंपाक करताना अनेकजण आधी भाज्या चिरतात आणि नंतर धुतात. मात्र ही पद्धत योग्य आहे का? भाज्या कापण्यापूर्वीच स्वच्छ धुणे अधिक योग्य आहे. असे केल्याने भाज्यांवरील माती, धूळ आणि इतर घाण दूर होण्यास मदत होते. शिवाय त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे टिकवून ठेवण्यासही मदत होते. भाज्या धुण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्त्वाचे आहे, कारण याचा परिणाम केवळ भाज्यांच्या स्वच्छतेवरच नाही, तर त्यातील पोषक घटकांवरही होऊ शकतो.
चिरण्यापूर्वी धुणे का योग्य?
भाज्या नेहमी कापण्यापूर्वी किंवा सोलण्यापूर्वी धुणे योग्य ठरते. भाज्यांच्या सालीवर माती, धूळ आणि जंतू असू शकतात. अशा भाज्या न धुता चिरल्यास चाकूच्या साहाय्याने बाहेरील घाण आणि जंतू भाज्यांच्या आतील भागात पोहोचू शकतात. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानेही फळे आणि भाज्या सोलण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी स्वच्छ धुण्याचा सल्ला दिला आहे. बटाटा, गाजर, काकडी यांसारख्या भाज्यांची साल काढायची असली, तरी त्या आधी पाण्याने स्वच्छ धुवाव्यात.
कापल्यानंतर भाज्या धुणे शक्यतो टाळावे. काही जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळणारी असतात. विशेषतः कापलेल्या भाज्या पाण्यात भिजत ठेवल्यास हे पोषक घटक पाण्यासोबत बाहेर पडू शकतात. भाज्या अतिशय बारीक चिरल्यास त्यांचा अधिक भाग हवेच्या संपर्कात येतो. त्यामुळे ऑक्सिडीकरणाच्या प्रक्रियेमुळे काही जीवनसत्त्वांचे प्रमाण कमी होऊ शकते. म्हणून भाज्या खूप बारीक चिरणे टाळावे आणि चिरल्यानंतर शक्य तितक्या लवकर त्यांचा वापर करावा.
भाज्या धुण्याची योग्य पद्धत कोणती?
भाज्या स्वच्छ करण्यासाठी साधे आणि स्वच्छ वाहते पाणी वापरणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. भाज्या पाण्याखाली धरून हाताने हलक्या हाताने चोळाव्यात. त्यामुळे त्यावरील माती आणि धूळ निघून जाण्यास मदत होते. काकडी आणि खरबूज यांसारख्या जाड किंवा कठीण सालीच्या भाज्या स्वच्छ ब्रशने घासून धुता येतात. केवळ पाण्याने धुतल्याने सर्व जंतू पूर्णपणे नष्ट होतीलच, याची खात्री नसते. मात्र वाहत्या पाण्याखाली भाज्या धुतल्याने त्यावरील बरीचशी घाण दूर होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा