मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी केवळ अभिनयामुळेच नव्हे, तर बेधडक वक्तव्यांमुळेही नेहमी चर्चेत असतात. एका मुलाखतीत त्यांनी आपल्या राहणीमानाबद्दल आणि मेकअपबाबत केलेलं वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. शाळेत असल्यापासून काम करणाऱ्या उषा नाडकर्णी यांनी आता ८० व्या वर्षात प्रवेश केला असून आजही त्या तितक्याच उत्साहाने काम करत आहेत.
मेकअपबाबत थेट भूमिका
ओठांना लाली लावून त्या कधी पोपटाची चोच करत नाहीत आणि डोळेही कधी रंगवत नाहीत, असं उषा नाडकर्णी यांनी मुलाखतीत सांगितलं. अभिनय करताना सुद्धा त्या ओठांना लाली लावत नाहीत. विनोदी अंदाजात त्या म्हणाल्या की, आता जराशी लाली लावली आहे, म्हणजे जरा गुलाबी वाटतं. पण सामान्यतः त्या अशा सजावटीपासून दूर राहतात. इंडस्ट्रीत अनेकजण कृत्रिम मुखवटे चढवून प्रेक्षकांसमोर येतात, पण तो मुखवटा उतरवल्यानंतर खरं बोलणारी माणसं फार कमी असतात, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
घरातही तितकीच साधी
घरी त्या गाऊन घालून असतात आणि स्वतःला व्हीआयपी किंवा सेलिब्रिटी समजत नाहीत, असं त्यांनी सांगितलं. कोणी भेटायला येणार असेल तर आधी कळवावं, म्हणजे पंजाबी ड्रेस घालून बसता येईल, असं त्या सांगतात. लग्नाला गेल्या तरी त्या अशाच साध्या असतात. घरातल्या बायकांसारखीच आपण साधी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांना नखरे येत नाहीत आणि कोणत्याही कार्यक्रमात शेठाणी म्हणून पुढे बसायला जाणं त्यांना आवडत नाही. हाच साधेपणा आणि स्पष्टवक्तेपणा त्यांना प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान देतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा