संसदेच्या आगामी विशेष अधिवेशनात सादर होणाऱ्या महिला आरक्षणाशी संबंधित परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याचा एकमुखी ठराव शनिवारी शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्यासाठी सर्व खासदारांनी रविवारीच दिल्लीला पोहोचावे, असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. मुंबईतील नंदनवन निवासस्थानी शनिवारी शिवसेना खासदारांची बैठक पार पडली.
बैठकीत एकमुखी ठराव
पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत शिवसेनेचे सर्व १५ खासदार उपस्थित होते. यात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग अप्पा बारणे, संदिपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, धैर्यशील माने, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि डॉ. ज्योती वाघमारे उपस्थित होते. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, खासदार मिलिंद देवरा आणि खासदार संजय दिना पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. लोकसभेचे सोमवारी, ३० नोव्हेंबरला, तर राज्यसभेचे बुधवारी, दोन डिसेंबरला विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात घटनादुरुस्ती व परिसीमन विधेयक सरकारकडून मांडले जाईल.
परिसीमन विधेयकाचे स्वरूप
या विधेयकाद्वारे महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल, असे शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांनी सांगितले की, या विधेयकामुळे लोकसभेची एकूण सदस्यसंख्या ५० टक्क्यांनी वाढून ५४३ वरून ८१५ इतकी होईल, तर महाराष्ट्रातील लोकसभा जागा ४८ वरून ७२ होतील. सन १९७६पासून मतदारसंघांची संख्या गोठवली आहे. सद्यस्थितीत एका खासदाराला २० ते २५ लाख नागरिकांचे प्रतिनिधित्व करावे लागत आहे. ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ या लोकशाही सूत्रानुसार मतदारांना न्याय देण्यासाठी आणि गावे व शहरांच्या समतोल विकासासाठी मतदारसंघ पुनर्रचना करणे काळाची गरज आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. यामुळे खासदारांचे काम सुटसुटीत होईल आणि मतदारांनाही आपल्या लोकप्रतिनिधींची भेट घेणे सोपे जाईल. शिवसेना-भाजप युतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच राष्ट्रहिताची भूमिका घेतली होती, त्याच वाटेवर चालून ‘नेशन फर्स्ट’ हीच शिवसेनेची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था प्रगतीपथावर आहे. सात टक्के जीडीपी दरामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनीही भारताचे कौतुक केले, असे ते म्हणाले. देश आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करीत असताना पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचे लोकसभेचे १३ आणि राज्यसभेचे दोन असे सर्व खासदार दोन्ही सभागृहांत विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, असे शिंदे म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा