मेट्रो मार्गालगत वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकामुळे नागरी सुविधांवर येणारा ताण, त्यासाठी महापालिकेला करावा लागणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च आणि अधिमूल्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचे वाटप — या मुद्द्यांवर पुणे महापालिका प्रशासनाने राज्य सरकारच्या प्रस्तावाला आक्षेप घेतला आहे. हस्तांतरणीय विकास हक्काऐवजी आकारल्या जाणाऱ्या अधिमूल्यातील ६६ टक्के हिस्सा मेट्रोला मिळणार असून, महापालिकेच्या वाट्याला केवळ ३३ टक्के उत्पन्न येणार आहे. त्याचबरोबर इमारतींच्या दर्शनी सामासिक अंतरातील सवलतीलाही प्रशासनाने विरोध दर्शविला आहे.
अधिमूल्याच्या वाटपाचा प्रस्ताव काय आहे?
राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंटच्या तरतुदींमध्ये फेरबदल प्रस्तावित केले आहेत. त्यासाठी १६ एप्रिल २०२६ रोजी अधिसूचना काढून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. या फेरबदलांचा शहराच्या पायाभूत सुविधा आणि महापालिकेच्या अर्थकारणावर होणारा परिणाम अधोरेखित करीत महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी प्रशासनाच्या हरकती आणि सूचनांना शहर सुधारणा समितीमार्फत सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे.
टीओडी क्षेत्रात हस्तांतरणीय विकास हक्क उपलब्ध नसल्यास किंवा त्याची कमतरता असल्यास अधिमूल्य आकारून संपूर्ण अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांकाचा वापर करण्यास परवानगी देण्याची तरतूद प्रस्तावित आहे. अशा प्रकरणांत अधिमूल्यातील ६६ टक्के वाटा मेट्रो प्रकल्पाची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेला, तर ३३ टक्के वाटा महापालिकेला मिळणार आहे. उर्वरित एक टक्का अधिभार म्हणून आकारला जाणार आहे.
महापालिकेच्या आक्षेपामागील कारणे
नियमावलीतील वाढीव एफएसआयमुळे शहरातील गृहनिर्माण प्रकल्पांमधील सदनिकांची संख्या यापूर्वीच वाढली आहे. टीओडी क्षेत्रातील लोकसंख्येची घनता आणखी वाढणार असल्याने रस्ते, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, जलशुद्धीकरण आणि मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प, वाहतूक व्यवस्था आणि पथदिवे आदी सुविधांच्या विस्तारासाठी महापालिकेला मोठी आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. या सुविधांच्या देखभाल-दुरुस्तीचाही भार महापालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे.
बारा मीटर आणि त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांलगत वाढीव एफएसआयचा वापर करण्यासाठी इमारतींच्या दर्शनी सामासिक अंतरात सवलत देण्याचेही राज्य सरकारने प्रस्तावित केले आहे. मात्र, या सवलतीमुळे जुन्या आणि नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारती एका सरळ रेषेत न येता त्या विस्कळित होणार आहेत. शहरातील १२ मीटरपेक्षा अधिक रुंदीचे बहुतांश रस्ते विकास आराखड्यातील असून, त्यापैकी अनेक रस्त्यांच्या जागांचा ताबाही महापालिकेने घेतला आहे. प्रस्तावित सवलतीमुळे विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचणी निर्माण होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १० ऑक्टोबर २०२२ रोजी मंजूर केलेल्या मूळ टीओडी नियमांमधील प्रस्तावित फेरबदलांचा पुनर्विचार करण्याची मागणी महापालिका प्रशासनाने केली आहे. वाढीव एफएसआय देताना त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी सुविधांच्या खर्चाची तजवीज कोण करणार, हा कळीचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा