देशभरात सध्या मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची चर्चा सुरू आहे. कायम विरोधात असलेला शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या विधेयकाबाबत भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा आहेत. शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विधेयकाला आमचा पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार यांच्या पक्षाचा एकही खासदार जाणार नसल्याचेही समोर आले आहे. एकीकडे इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने या विधेयकाला जाहीर विरोध केला आहे. या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या पक्षावर हल्लाबोल केला आणि खासदार अमोल कोल्हे यांना उघड आव्हान दिले.
राऊत काय म्हणाले?
आतापर्यंत या विधेयकाला पाठिंबा देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केल्याचे निदर्शनास आले असून ते चुकीचे आहे, असे राऊत म्हणाले. त्याचे समर्थन करता येणार नाही, आणि यावर खुलासे करणाऱ्यांची जनता पाठ काढेल, असेही ते म्हणाले. जनतेला हे पसंत नसल्याचे त्यांनी सांगितले.
बहुसंख्य मतदारसंघांमध्ये शिवसेनेचा प्रभाव असल्याचे सांगत राऊत म्हणाले की, शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेशिवाय तुम्ही जिंकू शकत नाही. सोलापूर आणि माढा मतदारसंघातही शिवसेनेची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही त्या जागांसाठी लढू, कसे जिंकून येता ते बघतो, असे आव्हान त्यांनी अमोल कोल्हे यांना दिले. अशी बेईमानी करता येणार नाही, आमचाही पक्ष फोडला, पण आम्ही शरण गेलो नाही, असेही राऊत म्हणाले. पक्ष फुटण्यापेक्षा देश महत्त्वाचा आहे, देश आणि धर्मासाठी शिवसेनेने नेहमी त्याग केला आहे, असे त्यांनी पुढे सांगितले.
कोल्हेंची प्रतिक्रिया
संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी संतापून प्रतिक्रिया दिल्यावर अमोल कोल्हे यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिली. खूप घाईने प्रतिक्रिया दिली जात असल्याचे त्यांना वाटते, असे कोल्हे म्हणाले. त्यांनी आदल्या दिवशी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया पाहिल्याचेही सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा