तीन वर्षांनंतर मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद पुन्हा रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. आगामी हंगामाआधी संघाने घेतलेल्या या निर्णयामागची कहाणी स्वतः रोहितने सांगितली आहे. सुरुवातीला त्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास थेट नकार दिला होता, मात्र एका खास भेटीनंतर त्याने आपला निर्णय बदलला.
मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर रोहितच्या विशेष मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मुलाखतीत रोहितने कर्णधारपदाची ऑफर कशी मिळाली आणि सुरुवातीला नकार का दिला, याचा खुलासा केला आहे.
आकाश अंबानींचा फोन आणि ती भेट
रोहितने सांगितले की, तो आपल्या पत्नीसोबत बोलत असताना आकाश अंबानींचा फोन आला. त्यानंतर दोघांची भेट झाली आणि संघाला पुढे कसे घेऊन जायचे, यावर सविस्तर चर्चा झाली. दोघांनीही आपापल्या कल्पना एकमेकांसमोर मांडल्या. याच भेटीत आकाश अंबानी यांनी रोहितला पुन्हा कर्णधारपद स्वीकारण्याची ऑफर दिली. मात्र रोहितने सुरुवातीला त्यासाठी नकार दिला होता.
रोहित म्हणाला की, सुरुवातीला त्याला वाटले की तो या जबाबदारीसाठी तयार नाही. घरी जाऊन विचार करतो, असे त्याने सांगितले. मागील काही काळात बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या, त्यामुळे पुन्हा हे काम आपण करू शकू की नाही, याबाबत त्याच्या मनात शंका होती.
भावनिक नात्यामुळे बदललेला निर्णय
अखेर मुंबई इंडियन्सशी असलेल्या भावनिक नात्यामुळेच रोहितचा विचार बदलला. संघाला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे त्याला जाणवले. संघाला नेत्याची गरज आहे, असे म्हणणार नाही, मात्र संघाला योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे त्याला आतून वाटत होते. हा संघ आपण स्वतः उभा केला आहे आणि दहा वर्षे त्याचे नेतृत्व केले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे आव्हान का स्वीकारू नये, असा विचार त्याच्या मनात आला.
प्रतिक्रिया व्यक्त करा