राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी नुकताच रामायण हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी राजा दशरथाने दिलेलं वचन आणि त्या वचनासाठी नीतीमत्तेला धरून प्रभू श्रीरामाने केलेल्या सर्वस्वाच्या त्यागाचा उल्लेख केला आहे. मात्र, आजच्या काळातील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्वार्थाच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल दुःखही व्यक्त केलं आहे.
दशरथाचं वचन आणि श्रीरामाचा त्याग
रोहित पवार यांनी आपल्या एक्स आणि फेसबुक अकाउंटवर रामायण चित्रपट पाहिल्यानंतरच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून नवीन आलेला रामायण चित्रपट बघण्याचा योग आल्याचं त्यांनी सांगितलं. दशरथाने दिलेलं वचन आणि त्या वचनासाठी नीतीमत्तेला धरून श्रीरामाने केलेला सर्वस्वाचा त्याग बघून नेहमीप्रमाणे खूपच प्रभावित झाल्याचं त्यांनी म्हटलं. पण प्रत्यक्षात मात्र अनेकांच्या आयुष्यात नेमकं याच्या उलट घडताना दिसतं. इतिहासाचाच संदर्भ द्यायचा तर त्यागाच्या रामायणाऐवजी स्वार्थाच्या पायावर उभं असलेलं महाभारतच घडताना दिसतं आणि हे पाहून मनाला अतिव दुःख आणि वेदना होतात, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या मुद्द्यावरून सध्या महाभारत घडत असताना त्यांची ही पोस्ट सूचक मानली जात आहे.
चित्रपटातील कलाकार आणि निर्मिती
दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी रामायण या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून नमित मल्होत्रा आणि यश यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रामायण : पार्ट १ हा महाकाव्यावरील चित्रपट मालिकेचा पहिला भाग आहे. या चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत, साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत, तर यशने रावणाची भूमिका साकारली आहे. रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत, तर सनी देओल हनुमानाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अरुण गोविल, लारा दत्ता आणि रकुल प्रीत सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं असून जगभरातील कमाईचा दोन हजार कोटींचा टप्पा लवकरच गाठण्याच्या तयारीत असल्याचं माहिती आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा