येत्या ३० नोव्हेंबर रोजी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले असून महिला आरक्षणाची अंमलबजावणी आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मार्ग मोकळा करणारे संविधान दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर होण्यासाठी सरकार पुन्हा एकदा प्रयत्न करणार असल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत एनडीएवर निशाणा साधला आहे.
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन डिलिमिटेशन विधेयक हे लोकशाहीविरोधी असल्याची भूमिका मांडली आहे. राहुल गांधी म्हणाले, आम्ही मत चोरीचा रस्ता उघड केला तेव्हा सरकारने हा नवीन रस्ता शोधून काढला आहे. आमच्या आकडेवारीनुसार, ८० टक्के भारतीय आणि जवळपास १०० टक्के तरुण पिढीचा विश्वास आहे की, नरेंद्र मोदी, अमित शाह आणि ज्ञानेश कुमार हे मतदानाची चोरी करतात. हे आम्ही सांगितल्याने, आता ते नवीन योजनेसह आले आहेत. हा फक्त एक पळून जाण्याचा मार्ग आहे, असे त्यांनी म्हटले.
## ‘भाजपकडून मत चोरण्याचा नवा मार्ग’
पुढे राहुल गांधी म्हणाले की, भाजपकडून मत चोरण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा हा नवीन मार्ग आहे. निवडणूक आयोगाने स्वतः दिलेल्या माहितीनुसार, २०२४ साली १४ कोटी लोकांनी केलेले मतदान हे चुकीचे आहे. त्यामुळे त्यांच्याच म्हणण्यानुसार, ही २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर आहे, असा दावा त्यांनी केला.
पुढे राहुल गांधी म्हणाले की, महिला आरक्षण विधेयक आधीच मंजूर करण्यात आले आहे. मग ८५० जागा का वाढवायच्या आहेत. हा बदल करण्याचे खरे कारण काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मतदारसंघावर वार करण्यासाठी आणि स्वतःच्या सोयीचे मतदारसंघ बनवण्यासाठी मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. ८५० जागा वाढवणं हा लोकशाहीचा खून आहे, असे ते म्हणाले. भारताच्या मतदारसंघाचा नकाशा बदलण्याचं काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष अधिवेशनात या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा