बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वानंतर आता पाकव्याप्त काश्मीरमधूनही पाकिस्तानसमोर एक नवे सुरक्षा आव्हान उभे राहिले आहे. रावलकोटमध्ये जानबाज फोर्स या सशस्त्र गटाने लष्कराविरुद्ध युद्ध पुकारल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे त्या भागातील तणाव लक्षणीयरीत्या वाढला असून, पाकिस्तानच्या विविध प्रदेशांमध्ये उसळत असलेल्या असंतोषाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांत राजकीय हक्क, स्थानिक स्वायत्तता आणि जनतेच्या मागण्यांवरून नाराजी बऱ्याच काळापासून धुमसत आहे. बलुचिस्ताननंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्येही सशस्त्र संघर्षाची भीती व्यक्त होत आहे. हे दावे खरे ठरले, तर पाकिस्तानसमोर आणखी एक मोठे सुरक्षा आव्हान उभे राहू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
जानबाज फोर्स म्हणजे काय?
जानबाज फोर्स ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या तहरीक-ए-तहफ्फुज-ए-जम्मू-ओ-काश्मीर या संघटनेची सशस्त्र शाखा असल्याचे सांगितले जाते. या गटाचे नेतृत्व गाझी शहजाद नावाचा माजी पाकिस्तानी सैनिक करतो. तो पाकव्याप्त काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील गराला गावचा रहिवासी असल्याचे म्हटले जाते.
या गटाने इशारा दिला आहे की, पाकिस्तानी सैन्याने आंदोलकांविरुद्ध कोणतीही कारवाई केली, तर त्याला तसेच प्रत्युत्तर दिले जाईल. मे २०२३ मध्ये जानबाज फोर्सच्या स्थापनेची घोषणा झाल्यानंतर गाझी शहजादला दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जून २०२४ मध्ये रावलकोट जिल्हा तुरुंगातून पळून गेला होता.
पाकिस्तानसमोर नवे आव्हान
सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिक परिस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत तणाव कायम आहे. पाकिस्तान प्रत्येक आंदोलनाला आणि असंतोषाला लष्करी कारवाईने प्रत्युत्तर देईल का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राजकीय मागण्या आणि जनतेच्या संतापाकडे दुर्लक्ष केल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
पाकिस्तानपुढील आव्हान आता केवळ सुरक्षा राखण्याचे नाही, तर राजकीय संवाद, जनतेचे हक्क आणि विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्याचेही आहे. रावलकोटमधील या घडामोडींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा