अहिल्यानगरच्या बोल्हेगाव परिसरातील संत तुकाराम नगरमधील स्वामी समर्थ केंद्रात एकाच वेळी २७ हजार भाविकांनी सामूहिक स्वामी चरित्र पारायण केले. या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद झाली असून, त्याबाबतचे प्रमाणपत्र केंद्राला नुकतेच प्रदान करण्यात आले.
२५ वर्षांच्या वाटचालीतील ऐतिहासिक क्षण
केंद्राचे प्रमुख समन्वयक चंद्रशेखर लोळगे काका यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी या केंद्राची स्थापना झाली. केंद्राच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीच्या पार्श्वभूमीवर २६ जुलै २०२६ रोजी २५ हजार सामूहिक स्वामी चरित्र पारायण सोहळ्याचा संकल्प लोळगे काका यांनी सोडला होता. या अभिनव उपक्रमाला अहिल्यानगर शहर व जिल्ह्यासह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि धाराशिव या शेजारील जिल्ह्यांतील भक्त व सेवेकरी यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. परिणामी २५ हजारांऐवजी तब्बल २७ हजार भाविकांनी सामूहिक पठण केले.
प्रमाणपत्र प्रदान सोहळा
विनर्स बुक ऑफ इंडिया या संस्थेने या उपक्रमाची जागतिक विक्रम म्हणून नोंद केली आहे. संस्थेचे अध्यक्ष व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ध्यानधारणा प्रशिक्षक डॉ. दीपक हारके यांच्या हस्ते या उपक्रमाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर लोळगे काका यांना जागतिक विक्रमाबाबतचे प्रमाणपत्र केंद्राच्या पटांगणात पार पडलेल्या एका भव्य विशेष समारंभात प्रदान करण्यात आले. यावेळी लोळगे काका व डॉ. हारके यांनी मार्गदर्शन केले. केंद्रातील सेवेकरी बंधू-भगिनींनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. अशा प्रकारचा जागतिक विक्रम करणारे बोल्हेगाव फाटा येथील स्वामी समर्थ केंद्र हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरले असल्याचे भाविकांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा