नवी मुंबईतील पाम बीच रोडवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव अज्ञात वाहनाने स्कूटीस्वार तरुणाला जोरदार धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून पसार झाला. या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. मृत तरुणाची ओळख अद्याप समोर आलेली नाही. अपघातानंतर मदतीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आणखी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास प्रतीक्षा
अपघातानंतर जखमी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका आणि ११२ क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधला. मात्र तब्बल अर्धा तास रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करूनही ती वेळेत पोहोचली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वेळेत उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
वेळेवर मदत मिळाली असती तर तरुण वाचला असता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी रुग्णवाहिका बोलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
रुग्णवाहिका चालकांवर कारवाईची मागणी
रात्रीची वेळ असल्याने चालक उपलब्ध नसल्याची कारणे दिली जातात आणि युनियनमुळे इतर रुग्णवाहिकांना परिसरात येऊ दिले जात नाही, असा आरोप स्थानिक प्रवाशांनी केला आहे. आणीबाणीच्या वेळी फोन करूनही रुग्णवाहिका येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. अशा रुग्णवाहिका आणि त्यांच्या चालकांवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी यावेळी स्थानिकांनी केली.
नवी मुंबईमध्ये ताज्या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २ अपघात होत असल्याची नोंद आहे, तर वार्षिक आकडेवारी ७५० ते ७८० इतकी आहे. त्यामुळे रुग्णवाहिका वेळेवर दाखल होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा