वाशिम शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील काही हॉटेल्स, नाश्ता सेंटर आणि कॅन्टीनमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरऐवजी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात असल्याची बाब समोर आली आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत तुलनेने अधिक असल्याने खर्च वाचविण्यासाठी काही व्यावसायिकांकडून घरगुती वापरासाठी असलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरचा व्यावसायिक कामासाठी वापर केला जात आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केवळ घरगुती स्वयंपाकासाठी अपेक्षित असताना काही हॉटेल्स आणि कॅन्टीनमध्ये त्याचा वापर होत असल्याचे चित्र दिसून येते.
खर्च वाचवण्यासाठी नियम डावलले जातात
शहरातील गर्दीच्या भागातील हॉटेल्स, चहा-नाश्त्याची दुकाने तसेच ग्रामीण भागातील काही गावांमधील कॅन्टीनमध्येही अशा प्रकारांची तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र, या प्रकाराकडे तालुका पुरवठा विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने अशा प्रकारांना आळा कधी बसणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकाराचा परिणाम केवळ शासनाच्या गॅस वितरण व्यवस्थेपुरता मर्यादित राहत नाही, तर सर्वसामान्य ग्राहकांनाही त्याचा अप्रत्यक्ष फटका बसण्याची शक्यता आहे. घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर वाढल्यास ग्राहकांच्या गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तपासणी मोहिमेची मागणी
वाशिम शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील हॉटेल्स, कॅन्टीन, नाश्ता सेंटर आणि खाद्यपदार्थ विक्री केंद्रांची तालुका पुरवठा विभागाने प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. व्यावसायिक वापरासाठी घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे का, याची पडताळणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
तसेच घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित आणि वेळेवर होण्यासाठीही आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे. तालुका पुरवठा विभाग या प्रकाराची दखल घेऊन प्रत्यक्ष तपासणी करणार का आणि नियमबाह्य वापराला आळा घालणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा