मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला विरोध करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपने जोरदार पलटवार केला आहे. भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, जर २०२४ च्या निवडणुका फसव्या असतील, तर राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा.
प्रसाद यांचा राहुल गांधींवर निशाणा
विरोधी पक्षनेत्यावर निशाणा साधत प्रसाद म्हणाले की, राहुल गांधींचं संपूर्ण वक्तव्य हे एका हताश आणि पूर्णपणे अराजकतावादी नेत्याचं आहे. खोटं बोलण्यात राहुल गांधी यांनी पीएचडी केली आहे, असंही ते म्हणाले. राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष महिला-विरोधी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
आम्ही सर्व विरोधी पक्षांना महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचं आवाहन करतो, असं प्रसाद म्हणाले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न हा जागतिक चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर सध्या काम सुरू आहे. इतर अनेक राजकीय पक्षांनीही पाठिंबा दर्शवला असून, हे विधेयक मंजूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राहुल गांधींचा आरोप काय?
यापूर्वी, काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की, भाजप मतदारसंघ पुनर्रचनेचा शस्त्र म्हणून वापर करून लोकसभेच्या जागांची संख्या ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवू इच्छितो आणि आपल्या राजकीय स्वार्थानुसार मतदारसंघांमध्ये बदल करून विरोधी पक्ष, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या प्रतिनिधित्वावर परिणाम करू इच्छितो.
शनिवारी पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, भाजप निवडणुकीत आधीच मतांची चोरी करत आहे आणि आता त्यांनी यासाठी एक नवीन मार्ग शोधण्याची योजना आखली आहे. लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवणं हे लोकशाहीला सुरुंग लावण्याच्या भाजपच्या योजनेचं प्रतीक आहे आणि यामुळे त्यांना आपल्या सोयीनुसार देशाचा निवडणूक नकाशा पुन्हा आखण्यासाठी मोठी मोकळीक मिळेल, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, भाजप अजूनही निवडणुकांमध्ये हेराफेरी करू शकतो, पण आता देशाला माहीत आहे की निवडणुकांमध्ये हेराफेरी होत आहे. आमच्या सर्वेक्षणानुसार, देशातील ८० टक्के आणि ‘जनरेशन झेड’मधील जवळपास १०० टक्के लोकांचा असा विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार निवडणुका चोरतात आणि आता त्यांनी यातून सुटण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा