भाजपची सत्ता हटवायची असे म्हणणाऱ्या डाव्या आणि समाजवादी पक्षांनी त्यासाठी नेमका पर्याय काय आहे, हे स्पष्ट केले पाहिजे. केवळ बैठका, चर्चा आणि ठराव करून परिवर्तन घडणार नाही. मूळ प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन नवा राजकीय अजेंडा मांडण्याची गरज आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी डावे आणि समाजवाद्यांना सुनावले.
फुले फेस्टिव्हलमधील चर्चासत्र
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आयोजित फुले फेस्टिव्हलमधील ‘विचार संगती’ या चर्चासत्रात आंबेडकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो, माजी आमदार कपिल पाटील, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण यादव आणि राष्ट्र सेवा दलाचे राजा कांदळकर उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, शोषित वर्गाचे डावे आणि समाजवादी हे सर्वांत जवळचे मित्र आहेत. मात्र, या मैत्रीला वैचारिक जोड देण्यात ते अपयशी ठरले. लोकशाहीच्या माध्यमातून झालेल्या परिवर्तनाला आपण आकार देऊ शकलो नाही. आपला मार्ग चुकीचा होता, हे डाव्या-समाजवाद्यांनी मान्य केले पाहिजे. तेव्हाच बदलाची अपेक्षा असणारे लोक आपल्यावर विश्वास ठेवतील.
राष्ट्रवाद आणि संघराज्य व्यवस्थेवर भाष्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे आणला, तेव्हा सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद यावर चर्चा घडवून आणण्याची गरज होती. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा ठामपणे मांडला नाही. आता संघ सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या पुढे जाऊन ‘कॉर्पोरेट राष्ट्रवाद’ आणत असून संघराज्य व्यवस्थेला धक्का देण्याचा प्रयत्न होत आहे. या बदलांवरही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांची अशीच अवस्था राहिली, तर संघर्ष सुरू राहील; मात्र संघर्ष करताना पराभवही स्वीकारावा लागेल आणि त्याची नोंद इतिहासात होईल, असा इशाराही त्यांनी दिला. २०१९ आणि २०२४ मध्ये मला बाहेर ठेवण्याचा परिणाम आज दिसत आहे. डावे आणि समाजवादी देशभर एकत्र आले, तर उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या राज्यांतही भाजपला सत्तेत येण्यापासून रोखता येईल. समाजघटकांना सोबत घेऊन लढण्याची इच्छा असेल, तर मी मदतीला तयार आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली.
प्रतिक्रिया व्यक्त करा