महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीतील जुन्या घडामोडींवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर केंद्र सरकारला दिलेला पाठिंबा आपल्याला मान्य नसल्याचे सांगतानाच, त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे शिवसेनेचे नुकसान झाल्याचा आरोप खैरे यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
पवारांच्या मागे जाऊन नुकसान झाले
शरद पवारांच्या मागे महाविकास आघाडीत जाऊन आम्ही आमचे नुकसान करून घेतले, असे खैरे म्हणाले. त्यांच्या मागे राहून शिवसेनेला नेमका काय फायदा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्तेतही राहता आले नाही आणि पवारांनी शिवसेनेला धोका दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीमध्ये जाण्याबाबत त्यावेळी अनेक नेत्यांनी सावध केले होते, असेही खैरे म्हणाले. पवार भाजपसोबत जातील आणि तुम्ही मात्र तसेच राहाल, असे अनेकजण सांगत होते, असा दावा त्यांनी केला. आताची परिस्थिती पाहता पवारांनी आपल्याला धोका दिल्यासारखेच झाले आहे, असेही ते म्हणाले. सुप्रिया सुळे यांची भूमिका देखील स्पष्ट नसून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू असल्याची टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसोबत राहण्याचा प्रश्नच नाही
शरद पवार यांच्या राजकीय इतिहासाचा दाखला देत खैरे यांनी आणखी गंभीर आरोप केले. वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे, असे ते म्हणाले. पवार हे बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला एकत्र आणले आणि स्वतःच निघून गेले, असा आरोप खैरे यांनी केला. पवारांबद्दल आदर असल्याचे सांगतानाच त्यांच्या भूमिकेमुळे दुःख झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. मी शरद पवारांना बाळासाहेबांसारखा मानतो, मात्र ते आज निघून गेले याचे आम्हाला दुःख झाले, असे खैरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसने उघडपणे बंड केल्याचा आरोप करत खैरे यांनी आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादीसोबत राहण्याचा प्रश्नच नसल्याचे स्पष्ट केले. आम्हाला महाविकास आघाडीत ढकलून हे स्वतः पळून गेले, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना खैरेंचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. आमचे एवढे आयुष्य गेले, यांच्या मागे आम्ही भरकटून गेलो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. याचवेळी एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांचा संदर्भ देत त्यांनी शिवसेनेच्या राजकीय वाटचालीवरही भाष्य केले. खैरेंच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबतची नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा