डिलिमिटेशनवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर गंभीर आरोप केले. विरोधकांना नेपाळ आणि बांगलादेशसारखी परिस्थिती भारतात करायची आहे, असे फडणवीस म्हणाले. त्यांना सरकार नाही, तर देशातील व्यवस्था बदलायची आहे, असा आरोप त्यांनी केला.
विरोधकांवर नेमके काय आरोप
फडणवीस म्हणाले की, विरोधकांचा उद्देश लोकशाही मोडीत काढणे आणि भारतात अराजकता निर्माण करून एक पूर्णपणे नवीन व्यवस्था प्रस्थापित करायची आहे. त्यांना केवळ सरकार बदलायचे नाही, तर संपूर्ण राजवटच बदलायची आहे. फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. राहुल गांधी दररोज खोटं बोलतात, असे ते म्हणाले. विरोधकांना भारतात अशी व्यवस्था आणायची आहे, जी नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये आहे, असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
लोकशाहीत सरकारे बदलतात
लोकशाहीत सरकारे बदलत असतात. कधी एका पक्षाची सत्ता असते, तर कधी दुसऱ्या पक्षाची. परंतु विरोधकांना केवळ सरकार बदलण्याबद्दल चर्चा नाही, तर ती रेजीम बदलण्याबद्दल आहे, असे फडणवीस म्हणाले. ही कोणती व्यवस्था आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही तीच व्यवस्था आहे, जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात लोकशाहीच्या स्वरूपात राज्यघटनेद्वारे प्रस्थापित केली होती. आता ती व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप फडणवीस यांनी केला.
प्रतिक्रिया व्यक्त करा