उत्तर प्रदेश सरकारने पोलिस प्रशासनात मोठे फेरबदल करत शुक्रवारी तब्बल ३० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मोहित अग्रवाल, पीयूष मोर्डीया, रमित शर्मा आणि प्रवीण कुमार या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
कोणाची कुठे नियुक्ती
वाराणसीचे पोलीस आयुक्त मोहित अग्रवाल यांची प्रयागराजच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पीयूष मोर्डिया यांची जागा घेतली आहे. तर पीयूष मोर्डिया यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बरेली झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक रमित शर्मा यांची लखनऊ झोनच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. तर लखनऊ झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण कुमार यांची बरेली झोनच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी नियुक्ती झाली आहे. आग्रा झोनचे अतिरिक्त पोलिस महासंचालक एस. के. भगत यांची लखनऊला बदली करण्यात आली आहे. तर अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर कार्यरत असलेले प्रशांत कुमार यांची आग्रा झोनच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या बदल्यांमध्ये गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादच्या पोलीस आयुक्तांची अदलाबदल करण्यात आली आहे. नोएडाच्या पोलीस आयुक्त लक्ष्मी सिंह यांची गाझियाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. तर गाझियाबादचे पोलीस आयुक्त जे. रविंदर गौड यांची नोएडाच्या पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. लक्ष्मी सिंह ३० नोव्हेंबर २०२२ पासून नोएडाच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांचा नोएडातील कार्यकाळ ३ वर्षे, ११ महिने आणि २८ दिवसांचा राहिला. जे. रविंदर गौड यांची १५ एप्रिल २०२५ रोजी गाझियाबादच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांनी गोरखपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम पाहिले होते. तसेच लखनऊ, मेरठ, मुरादाबाद आणि अलीगढ येथे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे.
लखनऊ रेंजचे पोलीस महानिरीक्षक किरण एस. यांची वाराणसीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच तांत्रिक सेवा विभागाचे उपमहानिरीक्षक आशीष तिवारी यांची सहारनपूर रेंजच्या उपमहानिरीक्षक पदी बदली झाली आहे. अयोध्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोवर यांची मुरादाबादच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदल्या
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. शुक्रवारच्या या मोठ्या फेरबदलाकडे त्याचाच भाग म्हणून पाहिले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा