मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेजिम चेंज या विषयावरून विरोधकांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या मते, ही केवळ सत्ता बदलण्याची चर्चा नाही, तर देशाची संपूर्ण व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून उभी केलेली लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करणे, हाच या प्रयत्नामागचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला.
जागतिक संस्थांच्या अहवालांचा दाखला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या बारा वर्षांत देशाने केलेल्या प्रगतीचा उल्लेख करताना फडणवीस यांनी तीन जागतिक संस्थांच्या अहवालांचा दाखला दिला. जागतिक बँकेने आपल्या ताज्या अहवालात भारताने चमत्कार घडवल्याचे म्हटल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक बँक नेहमीच भारताची टीकाकार राहिली आहे, असे नमूद करत त्यांनी अहवालातील निष्कर्ष मांडले. त्यानुसार गेल्या बारा वर्षांत पन्नास कोटी लोक तीव्र गरिबीतून बाहेर पडले असून, आता केवळ २.७ टक्के लोकच तीव्र गरिबीत राहिले आहेत.
काँग्रेसवर टीका, जनजागृतीचे आवाहन
काँग्रेसने साठ ते सत्तर वर्षे गरिबी हटवण्याचा नारा दिला, मात्र त्या काळात बावन्न ते चोपन्न कोटी लोक तीव्र गरिबीत होते, अशी तुलना फडणवीस यांनी केली. काँग्रेस खोटे बोलत असल्याचा आरोप करत त्यांनी देशहितासाठी जनतेने जागरूक राहण्याचे आवाहन केले. संविधान आणि लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येकाने सजग राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा