लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या, म्हणजेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून देशभरातील राजकारण तापले आहे. या विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचे चित्र दिसत असतानाच आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला ठाकरे गटही पाठिंबा देऊ शकतो, असा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
शरद पवार गटानंतर ठाकरे गटाकडे लक्ष
शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. त्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी शरद पवार गटावर टीका केली होती. आता महाजन यांनी ठाकरे गटाबाबतही तसाच दावा केल्याने आघाडीतील वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. राजकारणात कधीही काहीही घडू शकते, असे सांगत महाजन म्हणाले की, डिलिमिटेशनबाबतचे विचार पटले तर ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देऊ शकते. मात्र आजच याबाबत काही सांगता येणार नाही, असे सूचक विधानही त्यांनी केले.
डिलिमिटेशन झालेच पाहिजे, ही सर्वांची मागणी असल्याचे महाजन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. खासदारांची संख्या वाढली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्याच्या संख्याबळामुळे खासदारांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे शक्य होत नसल्याने हे विधेयक पारित झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. ठाकरे गटाच्या शिवसेनेला डिलिमिटेशनबाबतचे विचार पटले आणि त्यांनी पाठिंबा दिल्यास त्याचे स्वागतच असेल, असे महाजन म्हणाले.
काँग्रेस आणि संजय राऊत यांच्यावर टीका
याच मुद्द्यावर बोलताना महाजन यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही टीका केली. काँग्रेस आता एकाकी पडली असून ठाकरे गट काँग्रेसच्या मागे फरफटत चालला आहे, असे ते म्हणाले. शरद पवार गटाच्या खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊत यांनी शरद पवार गटावर टीका केली होती आणि यापुढे त्यांच्या विरोधात निवडणूक लढवून एकालाही विजयी होऊ देणार नाही, असा दावा केला होता.
त्यावर बोलताना महाजन म्हणाले की, संजय राऊत यांची बरोबरी होऊ शकत नाही. आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेल्याचा उल्लेख करत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ताकद दाखवून द्या, असे आव्हानही त्यांनी दिले. संजय राऊत शेलक्या भाषेत बोलतात, अशी टीका करत महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना राऊत यांना आवरण्याचा सल्ला दिला. राऊत यांच्या विधानांमुळे शिवसेना संपविण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा