अंबाजोगाई येथे एका उद्घाटन समारंभात बोलताना माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी बीडच्या राजकीय संस्कृतीवर मिश्किल भाष्य केले. बीडमधील प्रमुख व्यवसाय राजकारणच असून इतर सगळे व्यवसाय त्याला जोडून चालणारे जोडधंदे आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि राजकीय वर्तुळातही त्याची चर्चा सुरू झाली.
मी फक्त कार्यकर्त्यांसाठी आले आहे
कार्यक्रमाला येण्यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे प्रीतम मुंडे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले. कार्यकर्त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण या कार्यक्रमाला आलो आहोत, असे त्या म्हणाल्या. मंचावर एवढी मंडळी उपस्थित असताना राजकारणाची चर्चा होणारच नाही, हे शक्य नाही, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली. उपस्थितांची नावे आपण आधीच घेतली असल्याने पुन्हा कोणाचेही नाव घेण्याची गरज नाही, असेही त्या म्हणाल्या. निवडणुकीत मत मागण्यासाठी आपल्याला कोणाकडे जायचे नाही, असे स्पष्ट करत केज मतदारसंघाचा उल्लेख करून सध्या कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी सांगितले.
बीडच्या नसानसात राजकारण
बीडमध्ये प्रत्येक गावातील प्रत्येक माणसाच्या नसानसात राजकारण भरलेले आहे, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या. जगात इतर ठिकाणी कोणत्या गोष्टी घडतील किंवा नाही, हे सांगता येत नाही; मात्र बीडमध्ये प्रत्येक गोष्टीचे पडसाद उमटतात, अशी टिप्पणी त्यांनी केली. कोणतेही आंदोलन असो किंवा धरणे, ते बीडमध्ये झाल्याशिवाय त्याला पूर्णत्व येत नाही, असेही त्या म्हणाल्या. शेती हा येथील प्रमुख व्यवसाय नसून राजकारण हाच मुख्य व्यवसाय असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांसोबत असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी आपण कार्यक्रमांना येत असतो, कार्यकर्त्यांशिवाय आपल्याला करमत नाही आणि त्यांनाही आपल्याशिवाय करमत नाही, असेही त्या म्हणाल्या.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी प्रीतम मुंडे यांनी बहिणीसाठी एकदिलाने प्रचारात आघाडी घेतली होती; मात्र तरीही विजय मिळाला नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा