डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून, या भूमिकेवरून पवारांच्या पक्षाला टीकेचा सामना करावा लागत आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून ते सोमवारपासून सुरू होणार आहे. त्यापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना पवारांच्या भूमिकेवर निशाणा साधला.
अदाणींनी मनात आणले तर सुप्रिया सुळे एका क्षणात मुख्यमंत्री होऊ शकतात, असा दावा हाके यांनी केला. अदानीच देशातील सत्ता ठरवतात, असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका
हाके यांनी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकारणावर टीका केली. या सर्वांची धोरणे एकसारखी असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण, हेच आता समजत नसल्याचे ते म्हणाले.
ज्या अदानींचे, नरेंद्र मोदींचे आणि अमित शहांचे मित्र शरद पवार आहेत, त्या पवारांच्या कन्येला काहीही मिळू शकते, असे हाके म्हणाले. उद्या अदाणींनी मनात आणले तर सुप्रिया सुळे एका क्षणात मुख्यमंत्री होतील आणि अदानीच इथली सत्ता ठरवतात, हे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
पुरोगामी विचारावर प्रश्न
शरद पवार यांच्यासारखा फुले, शाहू आणि आंबेडकर यांचा पुरोगामी विचार सांगणारा नेता भाजपसोबत हातात हात घालून काम करत असेल, तर पुरोगामी विचार कुठे राहिला, असा सवाल हाके यांनी उपस्थित केला. सुप्रिया सुळे यांची खासदार म्हणून वेगळी ओळख असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा