हिवाळ्यात गरमागरम गाजराचा हलवा खाण्याची मजा वेगळीच असते. पण गाजर किसण्याचा कंटाळा येत असेल, तर आता काळजी करण्याचे कारण नाही. एका सोप्या पद्धतीने गाजर न किसताही प्रेशर कुकरमध्ये कमी वेळात स्वादिष्ट, मऊ आणि दाणेदार हलवा तयार करता येतो. फक्त सहा सोप्या पायऱ्या पाळल्या, की घरच्या घरी चविष्ट गाजराचा हलवा तयार होतो.
गाजर शिजवण्याची सोपी पद्धत
सर्वप्रथम एक किलो ताजी लाल गाजर स्वच्छ धुऊन आणि सोलून घ्यावीत. आता गाजर किसण्याऐवजी त्यांचे जाडसर तुकडे करावेत. यामुळे गाजर किसण्याचा वेळ वाचतो आणि हलवा बनवण्याची तयारीही पटकन होते. त्यानंतर प्रेशर कुकर गॅसवर ठेवून त्यात एक मोठा चमचा देशी तूप गरम करावे. त्यात गाजराचे तुकडे घालून व्यवस्थित परतून घ्यावेत. कुकरला एक शिट्टी येईपर्यंत शिजवावे. गाजर कुकरच्या तळाला चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी. कुकरमधील प्रेशर पूर्णपणे निघाल्यानंतर झाकण उघडावे. आता मॅशर किंवा पळीच्या मदतीने गाजर हलकेच मॅश करावेत. गाजर पूर्ण बारीक न करता थोडे दाणेदार ठेवावेत. त्यानंतर त्यात अर्धा किलो फुल क्रीम दूध घालून शिजू द्यावे.
मावा, सुकामेवा आणि वेलचीची चव
गाजरातील दूध थोडे आटू लागल्यावर चवीनुसार साखर घालावी. साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत मिश्रण हलवत राहावे. त्यानंतर त्यात 100 ग्रॅम मावा घालून चांगले एकजीव करावे. यामुळे हलव्याला छान मलईदार चव येते. आता एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तूप गरम करावे. त्यात बारीक चिरलेले बदाम, काजू, बेदाणे आणि सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालावेत. हे सर्व हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. हवे असल्यास सुकामेवा न भाजताही घालता येतो. शेवटी भाजलेला सुकामेवा हलव्यामध्ये घालावा. त्यासोबत एक चमचा वेलची पूड मिसळून काही वेळ मंद आचेवर शिजवावे. अशा प्रकारे तयार होतो स्वादिष्ट, दाणेदार आणि मऊ गाजराचा हलवा. विशेष म्हणजे गाजर किसण्याची अजिबात गरज नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा