मतदारसंघ पूनर्रचना विधेयकावरून देशात दोन गट पडले आहेत. सरकारने या विधेयकासाठी विशेष अधिवेशन बोलावले असून त्यात हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. इंडिया आघाडीतील मोठा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने या मुद्द्यावर भाजपला केंद्रात साथ देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पवार यांच्यावर चहूबाजूंनी टीका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ठाकरे यांच्यावतीने त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आदित्य ठाकरे यांची टीका
आदित्य ठाकरे यांनी या विधेयकासाठी लागणारा खर्च करदात्यांच्या खिशातून जाणार असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात आमदारांना पाच कोटी आणि खासदारांना पाच कोटी रुपयांचा निधी मिळतो, त्यामुळे विधेयक आणण्याऐवजी तो निधी दुप्पट करावा, असे त्यांचे म्हणणे आहे. एआय आणि तंत्रज्ञानाची अनेक माध्यमे उपलब्ध असताना भाजपकडून गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजपला निवडणुकीसाठी मतदारसंघांचे क्षेत्र बदलायचे असून स्वतःच्या विजयाची शक्यता वाढवायची आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपने ८५० जागा वाढवल्या किंवा एक हजार जागा केल्या तरी राम मंदिराच्या नावावर लूट केल्याचा आरोप असलेल्या त्या पक्षाला देश स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले. हे विधेयक देशद्रोही असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशाला प्रामाणिकपणाची आणि स्वाभिमानाची गरज असून भाजपच्या हुकूमशाहीविरोधात लढण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
दानवे यांची भूमिका आणि आघाडीतील फूट
आदित्य ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पक्षाबद्दल आपण बोलू शकत नाही, असे सांगत आपण या विधेयकाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अंबादास दानवे यांनी काही खासदारांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे कोल्हे यांचे म्हणणे असल्याचेही त्यांनी नमूद केले. आव्हाड यांच्या भूमिकेनंतर कोल्हे यांनी आपली भूमिका व्यक्त केली होती.
भाजपच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यास जनता नाकारेल, असे दानवे म्हणाले. अजूनही वेळ गेलेली नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा