शरद पवार यांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केले आहे. आव्हाड यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष असतानाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. या भूमिकेवर आता काँग्रेस नेत्यांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे.
नितीन राऊत यांची कठोर टीका
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री नितीन राऊत यांनी नाव न घेता शरद पवार यांच्या पक्षावर टीका केली आहे. या पक्षाने आघाडीच्या छाताड्यात खंजीर खुपसला आहे, अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली. इंडिया आघाडीतील मतभेदांवर भाष्य करताना राऊत म्हणाले की, ज्या नेत्याच्या पक्षाचे नाव सांगितले जात आहे, मुळात तो पक्ष विश्वासघातकी आहे. त्यांनी याआधीही विश्वासघात केला आहे आणि आज पुन्हा त्यांनी एक खंजीर खुपसला आहे. लोक निश्चितपणे जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असे राऊत म्हणाले. मोदी सरकारने नारी वंदन विधेयक आणले होते तेव्हा संपूर्ण सभागृहाने त्याला मंजुरी दिली होती. त्यावेळी महिला आरक्षण लागू करण्यास थांबवण्याचे काही कारण नव्हते आणि 2011 सालचे निकष घ्यायचे होते. आज डिलिमिटेशनबद्दल बोलताना 2011 सालचा निकष घेतला जात आहे, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरत आहे. त्यांना कोणालाही न्याय द्यायचा नाही, ना महिलांना, ना देशाला. स्वतःचे चांगभले करायचे आहे, त्यासाठी हा खटाटोप आहे, असे राऊत म्हणाले.
बळवंत वानखेडे यांचा विरोध
खासदार बळवंत वानखेडे म्हणाले की, लोकसभेच्या 50 टक्के जागा वाढवण्याच्या निर्णयामागे अनेक प्रश्न आहेत आणि मोदी सरकारच्या विधेयकाला काँग्रेसचा ठाम विरोध आहे. या विधेयकाच्या माध्यमातून संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवली जात आहे, असा आरोप त्यांनी केला. याआधी हे विधेयक मांडण्यात आले होते, मात्र मतदानात ते नामंजूर झाले होते. आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे विधेयक आणण्याच्या सरकारच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप खासदार वानखेडे यांनी केला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा