महाराष्ट्राच्या लोककलेचा इतिहास लिहिताना काही कलाकारांची नावे सुवर्णाक्षरांनी लिहावी लागतात. आपल्या अभिनयाने, नृत्याने आणि दमदार अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अशाच एक महान कलाकार म्हणजे विठाबाई नारायणगावकर. तमाशा आणि लावणी या लोककलांना वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक संकटांचा सामना करत त्यांनी कलेशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. कुटुंब, संसार आणि व्यावसायिक आयुष्य यांचा समतोल साधताना त्यांनी तमाशा कलेसाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले. त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्याग आणि कलेवरील निष्ठेची कहाणी आजही अनेक कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. ही कहाणी आता बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
## तमाशाच्या घराण्यात जन्म
विठाबाई नारायणगावकर यांचा जन्म १ जुलै १९३५ रोजी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब तमाशा कलेशी जोडलेले होते. त्यांचे आजोबा नारायण खुडे यांनी स्वतःची फिरती तमाशा फडाची परंपरा सुरू केली होती. त्यानंतर त्यांचे वडील भाऊ-बापू नारायणगावकर आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी ही कला पुढे नेली. लहानपणापासूनच विठाबाईंना लावणी, गवळण आणि तमाशातील विविध कलाप्रकार जवळून पाहायला मिळाले. त्यामुळे अभिनय आणि नृत्याचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्यांनी प्रत्यक्ष फडावरूनच कलेचे धडे गिरवले. गावोगावी जाऊन सादरीकरण करताना त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. त्यांच्या नैसर्गिक अभिनयशैलीने आणि रंगमंचावरील उपस्थितीने अल्पावधीतच त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
## संघर्षातून यशाकडे
विठाबाई नारायणगावकर यांचे आयुष्य सुरुवातीपासूनच अनेक संघर्षांनी भरलेले होते. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांनी तमाशाच्या फडात काम करण्यास सुरुवात केली आणि बालपण बाजूला ठेवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातभार लावला. त्यानंतरच्या काळात त्यांनी तमाशा क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आणि ‘तमाशा सम्राज्ञी’ म्हणून लौकिक मिळवला. कलेप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि जिद्द यामुळे त्यांचे नाव महाराष्ट्राच्या लोककलेच्या इतिहासात अजरामर झाले. आता त्यांच्या याच संघर्षमय प्रवासाची कहाणी ‘ईठा’ चित्रपटातून नव्या पिढीसमोर येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा