शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा दिल्याने इंडिया आघाडीत मोठी फूट पडली असून महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. पवार गटाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पवार गटाला सत्तेत जायचे असल्यामुळेच त्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असून जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे राज्यात मंत्री होणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा हवाला देत वेगळाच गौप्यस्फोट केला आहे.
राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी याबाबत काही बोलणे झाले का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत यांनी थेट उत्तर दिले. आमचा पक्ष फुटेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. या निर्णयावर टीका करताना राऊत म्हणाले की, तुम्हाला पक्ष महत्त्वाचा की देश महत्त्वाचा, ही आमची भूमिका आहे. आमचाही पक्ष फोडला गेला. डिलिमिटेशनला पाठिंबा मिळावा म्हणून आमचे सहा खासदार फोडले गेले. त्यामुळे आम्ही अमित शाह किंवा मोदी यांच्या पायाशी गेलो नाही. आम्ही लढत राहिलो आणि लढत आहोत. आमदार-खासदार येतील आणि जातील, पक्ष फुटतील. पण देश आणि महाराष्ट्र महत्त्वाचा आहे. पक्ष फुटण्याचे भय कुणाला, विचारधारा महत्त्वाची आहे. तुम्हाला भीती आहे तर तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही महाविकास आघाडीतून निवडून आला आहात, असा हल्ला राऊत यांनी चढवला.
१५० कोटींचा आरोप आणि इशारा
डिलिमिटेशन विधेयकाला जे खासदार मतदान करतील त्यांना प्रत्येकी १५० कोटी रुपये मिळालेत असे समजा, असे राऊत म्हणाले. मीच नाही, इतरही लोक तेच सांगत आहेत, असे त्यांनी सांगितले. १५० कोटी घेऊन महाराष्ट्राच्या विरोधात मतदान केले जात असेल तर तुमच्या विरोधात १५० खोक्याच्या घोषणा दिल्या जातील, असा इशारा राऊत यांनी दिला. राष्ट्रवादीच्या खासदारांनी चिंतन केले पाहिजे. तुमचा एकही खासदार परत निवडून येणार नाही. मोदी आणि शाह यांच्या बाजूने मतदान केले तर हे महाराष्ट्राच्या विरोधातील मतदान ठरेल. त्याविरोधात आम्ही रान उठवू. भाजपवाले व्यापारी लोक आहेत. त्यांनी राजकारणाचा व्यापार केला आहे. पवार गटाचे लोक मोदी आणि शाह यांच्या कच्छपी लागले आहेत. त्यांना फक्त मतदान करू द्या. महाराष्ट्र काय आहे हे जनताच दाखवून देईल, असा इशाराही त्यांनी दिला. पवार यांना महाविकास आघाडीने राज्यसभेत पाठवले होते. त्यावेळी अनेकांचा विरोध होता. पवार राज्यसभेत जावेत म्हणून मी पुढाकार घेतला होता, असेही राऊत म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा