देशात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर जोरदार चर्चा सुरू असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या विषयावरून दोन गट पडल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चेमुळे पक्षातील काही आमदार आणि खासदार नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले. पवार गट इंडिया आघाडीचा भाग आहे. विधेयकावर भूमिका ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीलाही पवार गट उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. या घडामोडींमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पवार गटाचे खासदार या विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षात नाराजीचे वातावरण का?
सूत्रांच्या माहितीनुसार मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून पक्षाची भूमिका अद्याप स्पष्ट नसल्याने काही नेत्यांच्या मनात खदखद आहे. आधीच विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पक्षात संभ्रमाचे वातावरण होते. त्यात आता या विधेयकावरूनही सस्पेन्स कायम असल्याने पक्षाच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची नाराजी नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे काही आमदार आणि खासदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील एक खासदार आणि दोन आमदारांनी शिंदे यांच्याकडे ही खदखद व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाकरे गटानंतर आता पवार गटाचे लोकप्रतिनिधीही शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लक्ष
दरम्यान, आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार यांचे खासदार उपस्थित राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पवार गटाच्या भूमिकेबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून पवार गटावर थेट टीका केली जात आहे. पवार यांना सत्तेत जायचे वेध लागले आहेत, असे खडे बोल काँग्रेसने सुनावले आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा