, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

दोन सख्या भावांशी लग्न; सुनीता नेगीची अनोखी लव्हस्टोरी

शिलाई परिसरात राहणाऱ्या सुनीता नेगी यांनी दोन सख्या भावांशी लग्न केले आहे. 'जाजड़ा' परंपरेनुसार हे लग्न झाले असून, त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा सुरू आहे.

दोन सख्या भावांशी लग्न; सुनीता नेगीची अनोखी लव्हस्टोरी

एका महिलेला एकाच वेळी दोन सख्या भावांवर प्रेम होते आणि ती दोघांसोबत लग्न करते, असे ऐकल्यावर अनेकांना आश्चर्य वाटेल. एवढेच नाही तर कुटुंबीयही या लग्नाचा स्वीकार करतात. हिमाचल प्रदेशात राहणाऱ्या सुनीता चौहाण यांच्यासोबत असेच घडले आहे. सुनीता यांनी दोन सख्या भावांवर प्रेम केले आणि त्यांच्यासोबतच लग्न केले. लग्नानंतर सुनीता चौहाण या सुनीता नेगी झाल्या असून, सध्या सर्वत्र त्यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.

‘जाजड़ा’ म्हणजेच जोडीदार विवाह

हिमाचल प्रदेशातील शिलाई परिसरातील एका अनोख्या विवाहपरंपरेची सध्या चर्चा सुरू आहे. येथील सुनीता नेगी यांनी दोन सख्ख्या भावांशी लग्न केले असून, या विवाहाला स्थानिक भाषेत ‘जाजड़ा’ किंवा ‘जोडीदार विवाह’ असेही म्हटले जाते. या परंपरेनुसार एका महिलेचे दोन किंवा अधिक पती असू शकतात. सुनीता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

“माझं लग्न माझ्या पसंतीने झालं आहे. मला दोघांवरही प्रेम झालं, त्यामुळे मी दोघांशी लग्न केलं. दोन्ही पतींवर माझे समान प्रेम आहे. विवाहाचे विधी एका पतीसोबत झाले असले तरी हे लग्न दोघांच्या नावावर मानलं जातं. मला एक मूल असून माझे वैवाहिक आयुष्य आनंदात सुरू आहे,” असे सुनीता यांनी सांगितले.

दोन्ही भाऊ चालवतात रेस्टॉरंट

सुनीता यांचे पती प्रदीप नेगी आणि कपिल नेगी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. कपिल यांचे वय २८ वर्षे, तर प्रदीप यांचे वय ३५ वर्षे आहे. सुनीता यांचे विवाहविधी प्रदीप यांच्यासोबत पार पडले. या विवाहपरंपरेमागील कारण स्पष्ट करताना प्रदीप नेगी म्हणाले, “घरातील दोन-तीन भाऊ एकत्र राहावेत, दोन वेगवेगळी लग्नं झाल्यास दोन कुटुंबं तयार होतात, खर्च वाढतो आणि जमिनीचे विभाजन होते. हे टाळण्यासाठी या परंपरेनुसार विवाह केला.”

कपिल आणि प्रदीप हे दोघेही रेस्टॉरंट व्यवसाय चालवतात. त्यांच्या रेस्टॉरंटचे नाव ‘जोडीदार भाई फॅमिली रेस्टॉरंट’ असे आहे. रेस्टॉरंटच्या बाहेर सुनीता आणि दोन्ही भावांचा एकत्रित फोटोही लावण्यात आला आहे. सुनीता यांच्याशी विवाह झाला, त्यावेळी कपिल नेगी हे बहरीनमध्ये नोकरी करत होते. मात्र आता ते गावात परतले असून दोन्ही भावांनी मिळून रेस्टॉरंट सुरू केले आहे. तिघेही सोशल मीडियावर सक्रिय आहेत.

या मुलाखतीत कपिल नेगी यांनीही आपली भावना व्यक्त केली. त्यांचे आपल्या लहान भावावर पत्नीपेक्षाही अधिक प्रेम असल्याचे त्यांनी सांगितले. शिलाई परिसरातील अनेक कुटुंबांमध्ये ही विवाहपरंपरा आजही पाळली जाते. ग्रामस्थांच्या मते, ही प्रथा महाभारत काळापासून चालत आली आहे. मात्र या परंपरेबाबत गावात वेगवेगळी मते आहेत. काही महिलांनी या प्रथेला विरोध दर्शवला असून, एका महिलेचे एकच पती असावा, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे पारंपरिक संस्कृतीचा भाग मानली जाणारी ही विवाहपद्धती आता कुठेतरी लोप पावत आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance