देशात सध्या मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावरून जोरदार चर्चा सुरू असतानाच धाराशिवमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी एक वेगळाच दावा केला आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर सोशल मीडिया खाती बंद करण्यात आल्याचा आरोप धाराशिव जिल्हा काँग्रेसने केला आहे. केवळ आरोप करून कार्यकर्ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन तक्रारही दिली आहे.
तीन खाती अचानक बंद झाल्याचा दावा
मुरूम येथील ‘स्वच्छ मुरूम अभियान’ या उपक्रमाचे इन्स्टाग्राम खाते, तसेच काँग्रेसचे जिल्हा सचिव राजकुमार हिरेमठ यांचे फेसबुक खाते आणि यूट्यूब चॅनेल अचानक बंद झाल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मुरूम पोलीस ठाण्यासह जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पदाधिकारीही चक्रावले असून, जिल्ह्यात या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे.
खाती सुरू करण्याची मागणी
बंद करण्यात आलेली सोशल मीडिया खाती तातडीने पूर्ववत सुरू करावीत, तसेच या कारवाईमागील कारणांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही काँग्रेसचे जिल्हा सचिव राजकुमार हिरेमठ यांनी दिला आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन दिले असून, आता या तक्रारीवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा