ठाण्यातील रिक्षा संघटनांनी १ डिसेंबरपासून पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत रिक्षाचालकांच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रस्तावित आंदोलन मागे घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, रिक्षाचालक आणि प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरली आहे.
बैठकीत कोणते निर्णय झाले
या बैठकीला ठाणे महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत रिक्षाचालकांच्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांच्या मागण्या केवळ ऐकून न घेता त्यावर ठोस उपाययोजना करण्याची भूमिका सरनाईक यांनी घेतली. रिक्षाचालकांच्या व्यवसायातील अडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि त्यांना सन्मानाने उदरनिर्वाह करता आला पाहिजे, यासाठी शासन निश्चितच सकारात्मक असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
सीएनजी चाचणी आणि बाईक टॅक्सीचा मुद्दा
सीएनजी रिक्षांच्या हायड्रो टेस्टिंगच्या नावाखाली होणारी कथित मनमानी आणि रिक्षाचालकांची आर्थिक पिळवणूक याबाबतही बैठकीत चर्चा झाली. या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले. बेकायदेशीर सुरू असलेल्या बाईक टॅक्सी सेवांमुळे रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही संघटनांनी उपस्थित केला. त्याची गंभीर दखल घेत अशा बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. रिक्षा भाडेवाढीबाबत संघटनांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांचीही दखल घेण्यात आली. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर शासन संवेदनशील असून, त्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही, असे सरनाईक म्हणाले. मात्र कोणत्याही आंदोलनामुळे सर्वसामान्य प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हीदेखील शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा