सातारी स्वॅग, बेधडक स्वभाव आणि कुटुंबासाठी असलेलं हळवं मन… झी मराठीवरील ‘येतेच आता मी नांदायला’ या मालिकेत हर्षद अतकरी एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सलग पाच मालिका केल्यानंतर ब्रेक घेण्याचा विचार असतानाच या मालिकेतील व्यक्तिरेखेने मात्र त्याला आकर्षित केले. सर्व चांगलं असल्यामुळे या भूमिकेला नकार द्यायचा प्रश्नच नव्हता, असे तो म्हणतो.
सहावी मालिका, वेगळी भूमिका
दोन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतताना चाहत्यांना काय खास पाहायला मिळणार, यावर हर्षद मनापासून म्हणाला की ही त्याची प्रमुख भूमिका असलेली सहावी मालिका आहे. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असते. याआधी त्याने सलग पाच मालिका केल्या होत्या, त्यामुळे आता थोडा ब्रेक घ्यायचा असे ठरवले होते. मात्र मनाला भिडेल अशी भूमिका शोधत होता.
‘येतेच आता मी नांदायला’मधील पात्र आधीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आहे. या भूमिकेत रांगडेपणा आहे, जो त्याने याआधी कधीच साकारला नव्हता. हे पात्र त्याच्यासाठी पाथब्रेकिंग आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे नकार द्यायचा काही प्रश्नच नव्हता. झी मराठीसह आधीही कामाच्या संधी आल्या होत्या, पण त्यावेळी काही ना काही कारणाने त्या राहून गेल्या. ही संधी मिळाली आणि त्याचा त्याला खूपच आनंद होत आहे.
सातारी ठसका आणि तयारी
मालिकेतील हा मुलगा मनात येईल ते बेधडक बोलून टाकतो. तो खूप बिनधास्त आहे आणि स्वतःच्या पद्धतीने जगणारा आहे. त्याच्यात एक प्रकारचा रांगडेपणा आणि स्वॅग आहे. तो प्रॅक्टिकल आहे, जुगाडू आहे आणि अनेकदा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करतो. त्याचं बेफिकीर वागणं हेच त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व आहे, असे हर्षद सांगतो.
मुळात सातारी ठसका हा खूप वेगळा आहे. तिथले लोक तोंडावर बोलणारे आणि बेधडक असतात. मनात येईल ते बोलून टाकण्याची त्यांची एक शैली आहे. ही भाषा आणि त्यांचा स्वभाव समजून घेणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेचा रांगडेपणा केवळ संवादातून नाही, तर तिच्या वागण्यातून आणि देहबोलीतूनही दाखवण्याचा प्रयत्न केला, असे हर्षदने सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा